यंदा मान्सून समाधानकारक; स्कायमेटचा अंदाज

पावसाळ्याच्या चारही महिन्यांचा एकंदरीत विचार करता देशाच्या पश्चिम आणि मध्य विभागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल. उत्तर आणि दक्षिण विभागांत सरासरी पाऊस पडेल, तर पूर्व आणि ईशान्य विभागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल.
यंदा मान्सून समाधानकारक; स्कायमेटचा अंदाज
Published on

नवी दिल्ली : यंदाच्या पावसाळ्यात देशभरात समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान अभ्यास संस्थेने दिला आहे. देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत अनेक वर्षांच्या सरासरीनुसार ८६८.६ मिमी इतका पाऊस पडतो. यंदा या सरासरीच्या तुलनेत १०२ टक्के पाऊस पडेल. पावसाळ्याच्या पूर्वार्धात थोडा कमी पाऊस पडेल, पण उत्तरार्धात समाधानकारक पाऊस होईल, असे स्कायमेटने म्हटले आहे.

पावसाळ्याच्या चारही महिन्यांचा एकंदरीत विचार करता देशाच्या पश्चिम आणि मध्य विभागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल. उत्तर आणि दक्षिण विभागांत सरासरी पाऊस पडेल, तर पूर्व आणि ईशान्य विभागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात समाधानकारक पाऊस असेल. केरळ, कोकण, कर्नाटक आणि गोव्यात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होईल. मात्र, बिहार, झारखंड, ओदिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, देशात जून ते सप्टेंबर या काळात अतिवृष्टीची शक्यता १० टक्के आहे. सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता ४५ टक्के, सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता २० टक्के, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता १५ टक्के आहे, तर दुष्काळी परिस्थिती उद‌्भवण्याची शक्यता १० टक्के आहे. पावसाळ्याच्या प्रत्येक महिन्याचा स्वतंत्र विचार करता जूनमध्ये सरासरीच्या ९५ टक्के, जुलैमध्ये सरासरीच्या १०५ टक्के, ऑगस्टमध्ये सरासरीच्या ९८ टक्के आणि सप्टेंबरमध्ये सरासरीच्या ११० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामानासंदर्भातील अल-निनोकडून ला-निनाकडे होणारे वेगवान स्थित्यंतर सुरुवातीला पाऊस कमी पडण्यास कारणीभूत असेल. मात्र, सकारात्मक हिंदी महासागर डायपोलचा परिणाम ला-निनाला सहाय्यभूत ठरेल आणि उत्तरार्धात पाऊस चांगला होईल.

logo
marathi.freepressjournal.in