कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांचे निधन

ज्येष्ठ कन्नड साहित्यिक, प्रसिद्ध कादंबरीकार एस.एल. भैरप्पा यांचे बुधवारी बंगळुरू येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांचे निधन
Photo : X ( @hd_kumaraswamy)
Published on

बंगळुरू : ज्येष्ठ कन्नड साहित्यिक, प्रसिद्ध कादंबरीकार एस.एल. भैरप्पा यांचे बुधवारी बंगळुरू येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. भैरप्पा यांना बेंगळुरू येथील राष्ट्रोत्थान रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भैरप्पा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. रुग्णालयाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, भैरप्पा यांना दुपारी २:३८ वाजता हृदयविकाराचा झटका आला. केंद्र सरकारने २०२३ मध्ये भैरप्पा यांना साहित्य आणि शिक्षणातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

संथेशीवर लिंगन्नय्या भैरप्पा यांना एस.एल. भैरप्पा म्हणून ओळखले जाते. ते एक प्रसिद्ध कन्नड कादंबरीकार आणि पटकथा लेखक होते. कर्नाटकातील हसन येथे २० ऑगस्ट १९३१ रोजी जन्मलेले एस.एल. भैरप्पा २५ वर्षांहून अधिक काळ कन्नड भाषेतील सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांच्या लेखकांपैकी एक होते. त्यांच्या अनेक पुस्तकांचे हिंदी आणि इतर भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.

पद्मभूषण पुरस्काराने गौरव

भैरप्पा यांची पहिली कादंबरी ‘भीमकाया’ १९५८ मध्ये प्रकाशित झाली होती. तेव्हापासून भैरप्पा यांनी जवळपास २५ कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ ‘एनसीईआरटी’ (दिल्ली) येथे तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणूनही काम केले होते. एस.एल. भैरप्पा यांना २०१५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, तर २०२३ मध्ये केंद्र सरकारने भैरप्पा यांना साहित्य आणि शिक्षणातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

logo
marathi.freepressjournal.in