स्मोकर्सना झटका! टॅक्स वाढल्याने Gold Flake पासून Classic Connect च्या सिगारेट दरांत प्रचंड वाढ; 'धूम्रपान सोडा किंवा जास्त पैसे मोजा'

केंद्र सरकारने तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क (Excise Duty) लागू केल्यानंतर सिगारेटच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. सिगारेटच्या लांबी आणि प्रकारानुसार दरवाढ वेगवेगळी आहे. नव्या कररचनेनंतर १० सिगारेटच्या एका पाकिटासाठी आता ग्राहकांना किमान...
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : धूम्रपान करणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. केंद्र सरकारने तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क (Excise Duty) लागू केल्यानंतर सिगारेटच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. नव्या कररचनेनंतर १० सिगारेटच्या एका पाकिटासाठी आता ग्राहकांना किमान २२ ते २५ रुपये अधिक मोजावे लागणार असल्याची माहिती वितरकांनी दिली आहे. तर, प्रीमियम सिगारेटच्या १० सिगारेटच्या पाकिटामागे ५० ते ५५ रुपयांची वाढ होणार आहे. सिगारेटच्या लांबी आणि प्रकारानुसार दरवाढ वेगवेगळी आहे. 

७ वर्षांनंतर सिगारेटवर करवाढ

जवळपास सात वर्षांनंतर सरकारने प्रथमच सिगारेटवरील कर वाढवला आहे. यामुळे भारतातील तंबाखूवरील करप्रणाली जागतिक सार्वजनिक आरोग्य मानकांच्या जवळ पोहोचली आहे. फेब्रुवारी २०२६ पासून सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांवर ४० टक्के जीएसटी व्यतिरिक्त अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि उपकर आकारण्यात येणार आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क कायद्यातही दुरुस्ती करण्यात आली असून, सिगारेटच्या लांबीप्रमाणे प्रति सिगारेट उत्पादन शुल्क आकारले जाणार आहे.

ब्रँड आणि लांबीप्रमाणे दरवाढ

सिगारेटच्या लांबी आणि प्रकारानुसार दरवाढ वेगवेगळी आहे. वितरकांच्या माहितीनुसार, ७६ मिमी लांबीच्या प्रीमियम सिगारेटच्या १० सिगारेटच्या पाकिटामागे ५० ते ५५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. कंपन्यांनी अद्याप सुधारित कमाल किरकोळ दर (MRP) जाहीर केलेले नसले तरी, वितरकांनी जुन्या साठ्याचे बिलिंग नव्या ४० टक्के जीएसटी दरानुसार किरकोळ विक्रेत्यांना सुरू केले आहे.

वितरकांना तस्करी आणि बनावट सिगारेटची भीती

तथापि, इतकी मोठी दरवाढ झाल्यामुळे तस्करी आणि बनावट सिगारेटच्या प्रमाणात वाढ होण्याची भीती वितरकांनी व्यक्त केली आहे. ऑल इंडिया सिगारेट अँड टोबॅको डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन (AICPDF) च्या अंदाजानुसार देशभरात ८,००० ते ९,००० सिगारेट आणि तंबाखू उत्पादने विकणारे 'स्टॉकिस्ट' आहेत. एका वितरकाने पीटीआयला सांगितले की, “काही कंपन्यांनी सध्या साठा रोखून ठेवला आहे. नवीन कर रचनेनुसार बिलिंग सुरू झाल्यावर ते हा साठा पुन्हा बाजारात आणायला सुरुवात करतील. तंबाखू उत्पादने अजूनही छोट्या दुकानदारांसाठी महत्त्वाचा व्यवसाय आहे. जर हा व्यवसायही बेकायदेशीर नेटवर्ककडे गेला, तर प्रामाणिक विक्रेत्यांकडे काय उरेल?”

काही लोकप्रिय ब्रँड्सचे नवे दर

पीटीआयच्या माहितीनुसार,

  • विल्स नेव्ही कट (७६ मिमी) – आधी ₹९५ असलेले १० सिगारेटचे पाकीट आता सुमारे ₹१२० ला मिळू शकते

  • ८४ मिमी सिगारेट्स (गोल्ड फ्लेक किंग्स, लाईट्स, विल्स क्लासिक,माईल्ड्स ) – ₹१७० वरून थेट ₹२२०–₹२२५ पर्यंत जाण्याची शक्यता

  • क्लासिक कनेक्ट, स्लिम सिगारेट्स (९७ मिमी) – २० सिगारेटचे ₹३०० चे पाकीट ₹३५० पर्यंत जाऊ शकते.

एकंदरीत, सरकारच्या या निर्णयामुळे धूम्रपान करणाऱ्यांवर आर्थिक भार वाढणार असून, ‘धूम्रपान सोडा किंवा जास्त पैसे मोजा’ असा अप्रत्यक्ष संदेश दिला जात असल्याची चर्चा आहे.

logo
marathi.freepressjournal.in