कथित बेकायदेशीर बार प्रकरणात स्मृती इराणी यांच्या मुलीचे नाव समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेश, नेट्टा डिसूझा आणि काँग्रेस नेत्यांना त्यांच्या १८ वर्षांच्या मुलीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली आहे, तसेच स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेत्यांना लेखी बिनशर्त माफी मागावी आणि तत्काळ प्रभावाने आरोप मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे. गोव्यातील एका बारची मालकी इराणी यांच्या मुलीकडे असून या बारचा परवानाही अनधिकृत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना इराणी म्हणाल्या की, “अमेठीत झालेला पराभव गांधी घराण्याला पचवता आलेला नाही. त्यातूनच माझ्या कुटुंबीयांवर असे आरोप होत आहेत. तसेच २०२४मध्ये पुन्हा राहुल गांधी अमेठीतून उभे राहिले, तरी ते पराभूत होतील. माझी मुलगी राजकारण करत नाही. ती महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. ती बार तर चालवतच नाही. काँग्रेसने आरटीआयच्या आधारे निराधार आरोप केले आहेत; परंतु ज्या आरटीआयबद्दल बोलले जात आहे. त्यात माझ्या मुलीचा उल्लेखच नाही.” दरम्यान, आता स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या नेत्यांविरोधात कायदेशीर नोटीस पाठवली असून, बिनशर्त माफी मागण्याची तसेच केलेले आरोप मागे घेण्याची मागणी केली आहे.