.... म्हणून काँग्रेसने कमी जागा लढविल्या; काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला खुलासा

लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीतील ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसने जाणीवपूर्वक कमी जागा लढविल्या.
.... म्हणून काँग्रेसने कमी जागा लढविल्या; काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला खुलासा

नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीतील ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसने जाणीवपूर्वक कमी जागा लढविल्या. भाजपचा पराभव करण्याच्या रणनीतीचा हा एक भाग होता, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाने कमी जागा लढविण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ पक्षात आत्मविश्वासाचा अभाव होता असा नाही, विरोधकांच्या आघाडीचा विजय होण्यासाठीची ती तडजोड होती, असे खर्गे म्हणाले. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा या पक्षासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि स्टार प्रचारक आहेत, असे सांगून खर्गे यांनी प्रियांका गांधी-वढेरा यांनी निवडणूक न लढण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले.

वायनाड आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा विजय झाला तर त्यांनी कोणती जागा सोडावी असे वाटते, असे विचारले असता खर्गे म्हणाले की, त्याबाबतचा निर्णय स्वत: राहुल गांधीच घेतील. समविचारी पक्षांशी विचारविमर्श केल्यानंतर कॉंग्रेसने प्रत्येक राज्यांत युती करण्यासाठी समिती स्थापन केली होती. भाजपला पराभूत करण्यासाठी ही रणनीती पक्षश्रेष्ठींनी आखली होती, असे खर्गे म्हणाले.

केरळ, पश्चिम बंगाल व पंजाब या राज्यांमध्ये आघाडीतील अनेक घटकपक्ष एकमेकांविरुद्ध लढले. केंद्र सरकारविरुद्धच्या लढाईत हा ऐक्याचा अभाव घातक असल्याने इंडिया आघाडीने काही राज्यांमध्ये एकत्र येऊन लढत दिली, अन्यथा भाजपला विरोधकांमधील फुटीचा फायदा झाला असता, असे खर्गे यांनी सांगितले.

कॉंग्रेसने २०० जागा अन्य पक्षांसाठी सोडल्या

काँग्रेस पक्षाने आतापर्यंतच्या सर्वात कमी म्हणजे केवळ ३२८ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आणि २०० हून अधिक जागा इंडिया आघाडीतील अन्य पक्षांसाठी सोडल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in