
नवी दिल्ली : राजकारणाविषयी सडेतोड वक्तव्य करण्यासाठी ओळखले जाणारे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी समाजव्यवस्थेबाबत भाष्य करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ आणि समलैंगिक विवाहावर त्यांनी आपले मत व्यक्त केले. “समाजात लिंग गुणोत्तराचा समतोल राखणे आवश्यक आहे. जर प्रत्येक हजार पुरुषांमागे दीड हजार स्त्रिया असतील तर पुरुषांना दोन बायका ठेवण्याची परवानगी द्यावी लागेल, असे मत त्यांनी मांडले.
एका यूट्यूब पॉडकास्टमध्ये गडकरी म्हणाले की, “लिव्ह-इन रिलेशनशिप ही संकल्पना चुकीची आहे आणि ती समाज नियमांच्या विरोधात आहे. समलिंगी विवाहामुळे समाजरचनाही नष्ट होईल. मुले जन्माला घालणे आणि त्यांचे योग्य पालनपोषण करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. तुमच्याकडे मौजमजेसाठी मुले आहेत आणि जबाबदारी घ्यायची नाही, असे तुम्ही म्हणत असाल तर ते योग्य नाही.”
“लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे समाज व्यवस्था कोसळेल. समाजात काही नियम आहेत आणि त्यांचे पालन केले पाहिजे. मी एकदा लंडनमधील ब्रिटिश संसदेला भेट दिली होती आणि यूकेचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांना त्यांच्या देशासमोरील प्रमुख समस्यांबद्दल विचारले होते. त्यावेळी मला सांगण्यात आले की, युरोपीय देशांमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे पुरुष आणि महिलांना लग्न करण्यात रस नाही. ते ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’चा पर्याय निवडत आहेत. तसेच समलैंगिक विवाहामुळे सामाजिक व्यवस्थेचे पतन होईल. ‘लिव्ह-इन’ संबंध चांगले नाहीत,” असेही ते म्हणाले.
लिंग गुणोत्तराची आकडेवारी
२०११ च्या जनगणनेनुसार, भारतात दर एक हजार पुरुषांमागे ९४३ महिला आहेत. २०२१ च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ च्या अहवालानुसार, देशात दर एक हजार पुरुषांमागे एक हजार २० महिला आहेत. त्यामुळेच भविष्यात जर महिलांची संख्या वाढली तर मोठी समस्या निर्माण होईल, असे गडकरी यांनी सांगितले.