नियोजित आंदोलनापूर्वी वांगचुक यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप; घराबाहेर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

लडाखमधील विविध मागण्यांसाठी करण्यात येणाऱ्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आले असल्याचा आरोप हवामान व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केला आहे.
नियोजित आंदोलनापूर्वी वांगचुक यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप; घराबाहेर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त
Published on: 

लेह : लडाखमधील विविध मागण्यांसाठी करण्यात येणाऱ्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आले असल्याचा आरोप हवामान व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केला आहे. त्यांच्या लडाखमधील निवासस्थानाबाहेर सुमारे २५ पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

'लेह ॲपेक्स बॉडी'चे प्रमुख सदस्य असलेल्या वांगचुक यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. अधिकृतपणे अटक न करता एखाद्या व्यक्तीला शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होण्यापासून कसे रोखले जाऊ शकते, असा सवाल करत आपण या निर्बंधांना दंडाधिकारी, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हालचालीवर निर्बंध

समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या एका व्हिडिओ संदेशात वांगचुक यांनी सांगितले की, बुधवारी रात्रीपासून त्यांच्या निवासस्थानाबाहेर अनेक सुरक्षा रक्षक, वाहने आणि तंबू तैनात करण्यात आले आहेत. तसेच, दिवसा घराच्या चारही बाजूंना सशस्त्र जवान तैनात असल्यामुळे त्यांच्या हालचालींवर पूर्णपणे निर्बंध आले आहेत. प्रशासनाने त्यांना केवळ "घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे", या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त म्हणजे एकप्रकारे नजरकैदच असल्याचे ते म्हणाले.

आंदोलनाचे कारण

आगामी स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या तारखांसह लडाखच्या विविध मागण्यांसाठी वांगचुक आणि 'कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स'चे नेते धरणे आंदोलन करण्याच्या तयारीत होते. त्यामुळेच त्यांच्यावर हे निर्बंध लादण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हिवाळ्यात निवडणुका घेणे "अस्वीकार्य" असल्याचे वांगचुक म्हणाले, कारण या कडाक्याच्या थंडीत लडाखमधील बहुतांश नागरिक स्थलांतरित झालेले असतात.

आंदोलन सुरूच राहणार

याशिवाय, 'हिल कौन्सिल' निष्प्रभावी करण्यात आली असून त्यांना अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या वर्षी २४ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेच्या चौकशी आयोगाचा अहवाल जाहीर करण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. हे प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप करत मागण्या मान्य होईपर्यंत लडाखभर आंदोलन सुरूच राहील, असा इशारा वांगचुक यांनी दिला.

पोलिसांचे स्पष्टीकरण

दुसरीकडे, लडाख पोलिसांनी वांगचुक यांच्यावरील या प्रतिबंधात्मक कारवाईचे समर्थन केले आहे. केंद्रशासित प्रदेश लडाखचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि लेहचे जिल्हा दंडाधिकारी यांनी जारी केलेल्या मनाई आदेशांचे पालन करत ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. लेह नगरपालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा, मोर्चे आणि इतर सार्वजनिक गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)