लेह : लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी आणि सहाव्या अनुसूचीच्या दर्जासाठी झालेल्या आंदोलनात चार जणांचा मृत्यू आणि ९० जण जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक केली.
लडाखचे पोलीस प्रमुख एस. डी. सिंग जम्वाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दुपारी अडीच वाजता वांगचुक यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. त्यांना लडाखच्या बाहेर हलविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
वांगचुक यांच्यावर कोणते आरोप ठेवण्यात आले आहेत, याबाबत अधिकृत माहिती नसली तरी लडाख प्रशासनातील सूत्रांनी सांगितले की, त्यांच्याविरोधात कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू करण्यात आला आहे.
सावधगिरीचा उपाय म्हणून प्रशासनाने लेह परिसरात मोबाईल इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. लेह सर्वोच्च प्राधिकरण आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स यांचे प्रमुख नेते म्हणून वांगचुक मागील पाच वर्षांपासून राज्याच्या दर्जासाठी आणि लेह-कारगिलमधील नागरिकांच्या घटनात्मक हक्कांसाठी आंदोलनाचे नेतृत्व करत होते. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीर राज्यातून वेगळे करून लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आले होते.
दरम्यान, केंद्र सरकारने हिंसाचार भडकवल्याचा आरोप वांगचुक यांच्यावर ठेवला आहे. मात्र, वांगचुक यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.