नवी दिल्ली : लडाखमधील हिंसाचारानंतर पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक सीबीआयच्या रडारवर आले असून त्यांनी सुरू केलेल्या एका स्वयंसेवी संस्थेविरोधात परदेशी योगदान (नियमन) कायद्याच्या कथित उल्लंघनप्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.
गृहमंत्रालयाच्या तक्रारीनंतर दोन महिन्यांपूर्वी ही चौकशी सुरू करण्यात आली होती जी अजूनही चालू आहे. याबाबत सोनम वांगचुक यांनी सांगितले की, १० दिवसांपूर्वी सीबीआयचे एक पथक सरकारी आदेश घेऊन आले होते. या आदेशात म्हटले होते की केंद्रीय गृहमंत्रालयाच्या तक्रारीनुसार ते हिमालयीन इन्स्टिट्युट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज लडाखमधील (एचआयएएल) कथित एफसीआरए कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी कारवाई करत आहेत.
हिंसाचारामुळे आंदोलन मागे
दरम्यान, हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांनी त्यांचे १५ दिवसांपासून चालू असलेले उपोषण मागे घेतले. तसेच त्यांनी लडाखमधील तरुणांना शांततेने निदर्शन करण्याचे आवाहन केले आहे. हिंसा करून पाच वर्षांपासून चालू असलेले आपले आंदोलन खिळखळे करू नका, असेही त्यांनी म्हटले आहे.
सोनम वांगचूक यांनी स्थापन केलेल्या स्टुडण्ट्स एज्युकेशनल ॲण्ड कल्चरल मूव्हमेण्ट ऑफ लडाख या संस्थेचा परवाना आर्थिक अनियमिततेमुळे त्वरित रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी घेतला. संस्थेच्या अनेक खात्यांमध्ये आर्थिक अनियमितता आढळली, स्वीडनहून आलेला निधी राष्ट्रहितविरोधी असल्याचेही निदर्शनास आले त्यामुळे हा परवाना रद्द करण्यात आला.
लडाखमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला त्याला आपली फूस असल्याचा गृहमंत्रालयाचा आरोप म्हणजे बळीचा बकरा बनविण्याची क्लृप्ती असल्याचे वांगचूक यांनी म्हटले आहे. या प्रदेशाला भेडसावणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागू नये हा यामागील हेतू असल्याचेही ते म्हणाले. आपल्याला सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये (पीएसए) अटक होईल याची आपण तयारी ठेवली आहे, असेही ते म्हणाले. हिंसाचारग्रस्त लेहमध्ये गुरुवारी पोलीस आणि निमलष्करी दलांनी संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली आणि ५० जणांना स्थानबद्ध केले. आपल्याला तुरुंगात टाकल्यास सरकारसाठी ते अधिक त्रासदायक ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लेह शहरात बुधवारी सुरक्षा दल आणि आंदोलकांदरम्यान झालेल्या संघर्षात चार जणांचा बळी गेला तर ५९ जण जण जखमी झाले. यात २२ पोलिसांचा समावेश आहे. या हिंसाचाराला सरकारने सोनम वांगचुक यांना जबाबदार धरले आहे. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा तसेच घटनेचे सहावे परिशिष्ट लागू करावे या मागणीसाठी सोनम वांगचुक आणि इतर काहीजण गेल्या दोन आठवड्यांपासून उपोषणाला बसले आहेत. यादरम्यान उपोषणाकर्त्यांची प्रकृती बिघडली. त्यापैकी दोघांना मंगळवारी रुग्णालयात दाखल केल्याने आंदोलकांचा उद्रेक झाला. त्यातून आंदोलनाने हिंसक वळण घेतले.
वांगचूक यांनी काही महिन्यांपूर्वी केलेला पाकिस्तान दौरा चर्चेत आला आहे. अचानक उफाळलेल्या या हिंसाचारामागे पाकिस्तान कनेक्शन तर नाही ना, अशा शंका उपस्थित होऊ लागल्या. त्यासाठी वांगचूक यांनी फेब्रुवारीमध्ये केलेल्या पाकिस्तान दौऱ्यावर बोट ठेवले जाऊ लागले आहे. सोनम वांगचूक या वर्षाच्या सुरूवातीला म्हणजे फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानला गेले होते. वांगचूक इस्लामाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. ब्रेथ पाकिस्तान या पर्यावरण विषयावरील चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेतला होता. हे चर्चासत्र पाकिस्तानातील एका माध्यम समूहाने आयोजित केले होते.या दौऱ्यात असतानाच त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले होते.
वांगचुक यांच्यावर ठपका
दरम्यान, गृहमंत्रालयाने आरोप केला आहे की, सोनम वांगचुक यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे गर्दीला चिथावणी मिळाली आणि त्यातून हे हिंसक आंदोलन झाले. सरकार व लडाखमधील संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये चालू असलेल्या चर्चेतील प्रगतीमुळे काही राजकीय हेतू असलेल्या व्यक्ती समाधानी नाहीत. त्यामुळे ते सरकार व जनतेच्या संवाद प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.