

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी भारताचे नागरिकत्व स्वीकारण्यापूर्वीच त्या भारतातील मतदार बनल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. त्यानंतर आता याप्रकरणी दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने सोनिया गांधी यांच्यावर नोटीस बजावली आहे.
भारताचे नागरिकत्व स्वीकारण्यापूर्वीच मतदार यादीत नावाचा समावेश झाल्याच्या आरोपामुळे सोनिया गांधी यांच्यासमोरील कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भारताचे नागरिकत्व मिळण्यापूर्वी १९८० मध्ये सोनिया गांधी यांच्या नावाचा मतदार यादीत समावेश झाल्याप्रकरणी कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टामध्ये दाखल झालेली ही याचिका फेटाळण्यात आल्यानंतर त्याविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने सोनिया गांधी यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
याचिकाकर्ते विकास त्रिपाठी यांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची केलेली मागणी मॅजिस्ट्रेट कोर्टाने फेटाळली होती. आता त्रिपाठी यांनी या निर्णयाला आव्हान दिले आहे. सोनिया गांधी यांनी १९८३ मध्ये भारताचे नागरिकत्व स्वीकारले. मात्र, त्यांचे नाव १९८० सालच्या नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते, असा आरोप विकास त्रिपाठी यांनी केला. तसेच सोनिया गांधी यांचे नाव पहिल्यांदा मतदार यादीत जोडण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला असावा, असा दावाही त्रिपाठी यांनी केला.
नागरिकत्व न मिळवताच मतदार यादीत नाव समाविष्ट करून केलेल्या कथित फेरफाराप्रकरणी सोनिया गांधी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेबाबत राऊज एव्हेन्यू कोर्टाने सोनिया गांधी आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.