

नवी दिल्ली : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेली आणीबाणी ही एक चूक होती. नंतरच्या काळात त्यांनाही या निर्णयाबद्दल खंत वाटत होती, हे मला जाणवत होते, असे विधान काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले आहे. आपल्या आगामी 'बिलॉन्गिंगः अ जर्नी ऑफ लव्ह' या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केले.
एका ब्रिटिश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सोनिया म्हणाल्या, माझ्या मते इंदिरा गांधी या मनाने पूर्णपणे लोकशाहीवादी होत्या. आणीबाणीच्या काळात त्या अजिबात समाधानी नव्हत्या आणि तो निर्णय त्यांच्या मनावर एक मोठे ओझे बनून राहिला होता. आणीबाणी लागू करणे ही एक चूक होती आणि पुढे इंदिराजींनाही याची जाणीव झाली, असे मला वाटते.
आणीबाणीच्या निर्णयावरून गांधी कुटुंबात मतभेद होते. राजीव गांधी यांचा आणीबाणीला विरोध होता आणि त्यांनी इंदिराजींना पुढील निवडणुकीची वाट पाहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, धाकटे पुत्र संजय गांधी यांनी विरोधी पक्ष इंदिराजींना संपवून टाकेल, असा युक्तिवाद करत आणीबाणीचा आग्रह धरला. संजय गांधी यांच्यावर योग्य वेळी नियंत्रण ठेवले असते, तर त्यानंतर झालेले मोठे नुकसान टाळता आले असते, असे सोनिया यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.
एक इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या आणकी एका मुलाखतीत सोनिया म्हणाल्या की, आणीबाणीच्या घटनेकडे भूतकाळातील दृष्टिकोनातून पाहिल्यावर परिस्थिती अधिक स्पष्ट होते. आणीबाणीच्या काळात लोकशाही हक्कांची पायमल्ली झाली असली, तरी तो निर्णय घटनात्मक प्रक्रियेनुसारच घेण्यात आला होता. देशामध्ये हिंसक आंदोलने, सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ आणि सैन्याला आदेश न मानण्याचे केलेले आवाहन यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा सामना इंदिराजी करत होत्या. मात्र, नंतरच्या काळात त्यांना परिस्थितीची खरी जाणीव झाली होती. त्यांनी मार्च १९७७ मध्ये निवडणुका जाहीर केल्या आणि आणीबाणीच्या काळात झालेल्या अतीव चुकांबद्दल जाहीरपणे खेद व्यक्त करत देशवासीयांची माफीही मागितली होती, असेही सोनिया यांनी स्पष्ट केले.
मोदी राजवटीत देशाचे मोठे नुकसान
सोनियांनी मोदी राजवटीवरही टीका केली आहे. त्या म्हणतात, गेल्या १२ वर्षांच्या काळात देशाच्या सामाजिक-राजकीय रचनेचे, लोकशाहीचे आणि विविध घटनात्मक संस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेतून गेल्यानंतरही देशातील यंत्रणा पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी मोठा कालखंड लागेल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. देशातील नागरिक आता अस्वस्थ होऊ लागले असून या नुकसानाची जाणीव त्यांना होऊ लागली आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
इटालियन चष्मा काढून भारताची प्रगती पाहा - भाजप
सोनिया यांनी मोदी सरकारवर केलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले. गेल्या १२ वर्षांत भारताने सर्व क्षेत्रांत साधलेली प्रगती पाहण्यासाठी सोनिया गांधींनी आपला 'इटालियन चष्मा' काढून ठेवावा, असा टोला भाजपने लगावला आहे. जर तुम्ही तुमचा इटालियन चष्मा काढून पाहिलेत, तर तुम्हाला 'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास' आणि ७.८ टक्के जीडीपी वाढीसह जागतिक महासत्ता म्हणून उदयास येणारा भारत स्पष्टपणे दिसेल, असे भाजपचे राज्यसभा खासदार तरुण चुग चुग यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळातील विविध घोटाळे, १९८४ च्या शिखविरोधी दंगली आणि भोपाळ गॅस दुर्घटनेवरही सोनियांनी पुस्तकात लिहावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
मीडियावर ताबा, अमाप पैसा आणि धर्माचा गैरवापर
काँग्रेसच्या घसरणीबाबत आणि सध्याच्या स्थितीबाबत सोनिया गांधी म्हणाल्या, मी निराशावादी नाही, हे सरकार सत्तेत आल्यापासून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना समान संधी मिळालेली नाही. निवडणूक आयोगासारख्या सर्व घटनात्मक संस्थांवरील पूर्ण नियंत्रण, मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांवर ताबा, अमाप पैसा आणि धर्माचा गैरवापर या गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. या सर्व आव्हानांनंतरही काँग्रेस पक्ष समर्थपणे लढत असून पुढे जात आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आत्मचरित्रात काय
या पुस्तकाला राजकारणाची पार्श्वभूमी आहे. इटलीतील सोनियांचे बालपण आणि १९६५ मध्ये केंब्रिजमध्ये राजीव गांधी यांच्याशी झालेली भेट, भारतामध्ये आल्यानंतर हिंदी शिकणे, साडी नेसणे आणि भारतीय संस्कृतीशी जुळवून घेण्याचा त्यांचा प्रवास, संजय गांधी यांचा विमान अपघात, १९८४ मधील इंदिरा गांधी यांची हत्या आणि १९९१ मधील राजीव गांधी यांची हत्या यांसारख्या कौटुंबिक शोकांतिका, २००४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर पंतप्रधानपद स्वीकारण्यास दिलेला नकार आणि पुढील १० वर्षांचा राजकीय प्रवास यांचा आत्मचरित्रामध्ये समावेश आहे.
मोदी यांच्या राजकीय प्रवासातून काँग्रेसने काय शिकावे, या प्रश्नावर सोनिया म्हणाल्या, त्यांची विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे. काँग्रेस पक्षाच्या चौकटीत राहूनही डॉ. मनमोहन सिंग किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारखे नेते यशस्वी झाले आहेत. आम्हाला रा. स्व. संघाकडून शिकण्यासारखे काहीही नाही.
भगवद्गीतेने दाखवला मार्ग
आपल्याला राजकारणाबद्दल नेहमीच तिरस्कार वाटत होता आणि पती राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सक्रिय राजकारणात उतरायचे की नाही, यावरून आपण प्रचंड मानसिक संघर्षांतून जात होतो. मात्र, अशा कठीण प्रसंगी भगवदगीतेच्या अध्ययनाने आपल्या मनातील सर्व शंका दूर केल्या आणि आपल्याला कर्तव्याचा मार्ग दाखवला, असे त्यांनी मुलाखतीत म्हटले आहे. भगवद्गीतेतील "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" (फळाची आशा न धरता आपले कर्तव्य करत राहा) या श्रीकृष्णाच्या संदेशाने आपल्या मनाची द्विधावस्था समाप्त केली. माझ्या सर्व शंका आणि प्रश्नांची उत्तरे मला मिळाली होती. जेथे माझे कर्तव्य मला बोलावत होते, तेथे मला पाऊल टाकावेच लागणार होते आणि मी तेच केले, असे त्या म्हणाल्या.