

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना मंगळवारी रात्री सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयाचे चेअरमन डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या तब्येतीवर सतत लक्ष ठेवून आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पोटातील संसर्ग आणि मूत्रमार्गातील संसर्गाबाबत काही चाचण्या केल्या जात आहेत. उपचाराचा भाग म्हणून त्यांना प्रतिजैविके देण्यात आली आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हवामानातील बदलामुळे सोनिया गांधी यांना अस्वस्थ वाटू लागले होते, त्यामुळे त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी करण्यासारखे कोणतेही गंभीर कारण नसल्याचेही रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.