

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी सरकारच्या पायाखालची जमीन सरकली असून, हे सरकार फार काळ सत्तेत राहणार नाही, असा विश्वास काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केला आहे. सरकारच्या अलीकडील कृतींमधून त्यांच्यातील असुरक्षिततेची भावना स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सोनिया गांधी यांच्या ‘बीलॉंगिंग : ए जर्नी ऑफ लव्ह ’ या आत्मचरित्राचे मंगळवारी प्रकाशन झाले. या ५२६ पानी पुस्तकातून त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून राजकीय प्रवासापर्यंतच्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांना उजाळा दिला आहे. इटलीतील बालपण, केंब्रिजमध्ये राजीव गांधी यांच्याशी झालेली ओळख, राजीव गांधी यांची हत्या आणि त्यानंतर राजकारणात केलेला प्रवेश अशा विविध पैलूंवर त्यांनी भाष्य केले आहे.
मतदार याद्यांमध्ये फेरफार
सध्याचे सरकार आपली सत्ता आणि लोकप्रियता कायम असल्याचे चित्र निर्माण करत आहे. मात्र, माझ्या मते त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमे आजही पूर्वीप्रमाणेच पक्षपाती आहेत. तरीही सरकारच्या कृतींमधून त्यांच्यातील अस्वस्थता आणि असुरक्षितता दिसून येते. अलीकडील राज्यांच्या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार झाल्याचे संकेत मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या ‘व्होट चोरी’च्या आरोपांचाही त्यांनी उल्लेख केला. महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकार चर्चा टाळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नितीश कुमार यांचा उल्लेख, जेडीयू संतप्त
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांच्याबाबत करण्यात आलेल्या उल्लेखावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या उल्लेखावर जनता दल (युनायटेड)ने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची स्थापना करण्यात नितीश कुमार यांचीच प्रमुख भूमिका होती, असा दावा केला आहे. जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी सोनिया गांधी यांनी पुस्तकात संपूर्ण घटनाक्रम चुकीच्या पद्धतीने मांडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तर पक्षाचे कार्याध्यक्ष संजय कुमार झा यांनी सोनिया गांधी यांनी नितीश कुमार यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीला ‘क्षुल्लक आणि निरर्थक’ संबोधले. सोनिया गांधी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती, असेही त्यांनी म्हटले.
अण्णा हजारेंचे प्रत्युत्तर
‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आंदोलनाला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) छुपा पाठिंबा होता, या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या दाव्याला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप किंवा आरएसएसशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सोनिया गांधी यांचा आरोप फेटाळून लावला. “हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. माझा भाजप किंवा आरएसएसशी कोणताही संबंध नाही. मी त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला जात नाही. माझ्यासाठी माझा देश सर्वांत महत्त्वाचा आहे,” असे अण्णा हजारे यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.
शाहबानो प्रकरणावर सोनिया गांधींनी राजीव गांधींना विचारला होता जाब
शाहबानो प्रकरणावरून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना पत्नी सोनिया गांधी यांनीच जाब विचारला होता. वृत्तपत्रांमधून मुस्लिम महिलांच्या हिताचा बळी दिल्याचा आरोप होत होता.
‘सुपर पीएम’ - भाजपचा हल्लाबोल
पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार देऊन सोनिया गांधी यांनी मोठा त्याग केल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात त्यांनी पंतप्रधानपद नाकारून ‘सुपर पीएम’ होण्याचा मार्ग निवडला, असा खोचक टोला भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी लगावला. २००४ मध्ये पंतप्रधानपद स्वीकारण्याबाबत सोनिया गांधी यांच्या मनात मोठे द्वंद्व होते. सुरुवातीला त्यांनी या पदाची कल्पना नाकारली होती. मात्र, आघाडीतील सहकाऱ्यांच्या आग्रहानंतर त्यांनी सुरुवातीला अनिच्छेने होकार दर्शवला आणि अखेरीस ठामपणे नकार दिला, असे आत्मचरित्रात नमूद करण्यात आले आहे. त्रिवेदी म्हणाले, पंतप्रधानपद सोडून सुपर पीएम बनण्याचा हा कसला त्याग, जगात असे त्यागाचे उदाहरण कुठेही सापडणार नाही.