
नॅशनल हेराल्ड’प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ‘ईडी’ने मंगळवारी तब्बल सहा तास चौकशी केली. ‘ईडी’ने त्यांना बुधवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान, सोनियांच्या ‘ईडी’चौकशीच्या निषेधार्थ देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सत्याग्रह व निदर्शने केली. काँग्रेस नेते राहुल गांधींसह निदर्शने करणाऱ्या ५० काँग्रेस खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सोनिया गांधी राहुल व प्रियांकासह सकाळी ११ वाजता ‘ईडी’च्या कार्यालयात दाखल झाल्या होत्या. प्रियांका या ‘ईडी’ कार्यालयात सोनियांबरोबर थांबल्या; मात्र राहुल गांधी हे तेथून बाहेर पडले. ‘ईडी’ने सोनियांची मंगळवारी दोन फेऱ्यांत चौकशी केली. पहिल्या फेरीतील चौकशी दुपारी १.३० वाजेपर्यंत चालली. लंचनंतर सोनिया दुपारी ३.३०च्या सुमारास पुन्हा ‘ईडी’ कार्यालयात पोहोचल्या, तेव्हा त्यांची सायंकाळी ७ वाजेपर्यंत चौकशी झाली.
राहुल गांधींसह ५० काँग्रेस खासदार पोलिसांच्या ताब्यात
सोनियांच्या ‘ईडी’ चौकशीविरोधात काँग्रेस खासदारांसह राहुल गांधींनी राजधानीतील विजय चौकाजवळ धरणे आंदोलन केले असता, त्यांना व ५० काँग्रेस खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांचाही आंदोलनात सहभाग होता. काँग्रेसनेते मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल, शक्तिसिंह गोहिल यांच्यासह अनेक खासदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व काँग्रेस खासदार संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत निषेध मोर्चा काढत होते. यावेळी राहुल यांनी सरकारवर विरोधकांची मुस्कटदाबी सुरू केल्याचा आरोप केला. काँग्रेस नेत्यांना आंदोलन करण्यापासून रोखल्याबद्दल सचिन पायलट यांनीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून नेत्यांना लक्ष्य करत आहे, असा आरोप त्यांनी केला.