सोनिया भेट अफवा, कॅ. अरमिंदर यांनी शक्यता फेटाळली

पंजाबमधील कॉंग्रेस आम आदमी पक्षासोबत जाण्यास नाखूश आहे
सोनिया भेट अफवा, कॅ. अरमिंदर यांनी शक्यता फेटाळली

चंडिगढ : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस सोडून भाजप गटात दाखल झालेले पंजाबमधील दिग्गज राजकारणी कॅप्टन अरमिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासांतच अरमिंदर सिंग यांनी हे वृत्त निखालस खोटे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही एक निराधार अफवा असल्याचे सांगून त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.

सिंग पुढे म्हणाले की, समाजमाध्यमांवर हे वृत्त फिरत असून ते पूर्णत: निराधार आहे. त्यात रतीभर सुद्धा सत्याचा अंश नाही. आपण आता भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी बांधील आहोत. मी कायमचा निर्णय घेतला असून नेहमीच भाजपशी एकनिष्ठ राहणार आहे. अशा परिस्थितीत आपण मागे वळून पाहत नाही. आपण एकदा घेतलेला निर्णय कधीच बदलत नाही आणि हे माझ्या जीवनाचे तत्त्व आहे, असे अरमिंदर सिंग यांनी ठामपणे सांगितले आहे.

वर्षभरापूर्वीच अरमिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजप गटात प्रवेश केला होता. त्यांनी भाजपमध्ये थेट प्रवेश न करता पंजाब लोक काँग्रेस पीएलसी नावाचा स्वत:चा पक्ष काढला होता. नंतर त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला. २०२२ साली त्यांच्या पक्षाने विधानसभा निवडणूक लढवली, पण एकही जागा ते जिंकू शकले नाहीत. सध्या इंडिया आघाडीची स्थापना झाल्यापासून पंजाब काँग्रेस पक्ष आणि आम आदमी पक्ष यांच्यात तणाव सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणूक भाजपविरुद्ध एकजुटीने लढवावी अशी भूमिका इंडिया आघाडीने घेतली आहे, पण पंजाबमधील कॉंग्रेस आम आदमी पक्षासोबत जाण्यास नाखूश आहे. यामुळे तेथे राजकीय तणाव सुरू आहे.

पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा यांनी एक्सवर स्पष्टपणे जाहीर करून टाकले आहे की, राज्यातील नेते आगामी लोकसभेत आम आदमी पक्षासोबत जाण्यास तयार नाहीत. यामुळे पंजाबमध्ये आता राजकीय पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in