सोनियांनी घेतला ‘अग्निपथ’चा समाचार, सरकारी योजना दिशाहीन, पण तरुणांनी हिंसक आंदोलन करू नये

‘अग्निपथ’ योजनेच्या निषेधार्थ काँग्रेस रविवारी, १९ जून रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन
सोनियांनी घेतला ‘अग्निपथ’चा समाचार, सरकारी योजना दिशाहीन, पण तरुणांनी हिंसक आंदोलन करू नये
ANI

देशभरात केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ या लष्करातील भरतीच्या नव्या योजनेला तीव्र विरोध होत आहे. अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, रुग्णालयातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आंदोलक तरुणांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी तरुणांना अहिंसक पद्धतीने लढा देण्याचे आवाहन केले आहे.

सोनिया गांधींनी पत्रात म्हटले आहे की, ही योजना पूर्णपणे दिशाहीन असून तरुणांची मोठी फसवणूक आहे. मात्र, आम्ही तरुणांच्या पाठिशी आहोत. या योजनेवर संरक्षण तज्ज्ञ आणि माजी सैनिकांनीदेखील प्रश्न उपस्थित केले आहेत. ही योजना मागे घेण्यासाठी काँग्रेस अहिंसक आंदोलनाचा मार्ग अवलंबणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मला तुमची वेदना समजते!

‘मला तुमची वेदना समजते. सरकारने गेल्या तीन वर्षांपासून भरती काढलेली नाही. त्याचबरोबर हवाई दलात परीक्षा होऊनही तरुणांना निकाल आणि नियुक्तीची प्रतीक्षा आहे. आम्ही तुमचे हे दुःख समजतो आणि तुमच्यासोबत आहोत’, असे सोनियांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यावर सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने १२ जून रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जंतरमंतरवर काँग्रेसचे आंदोलन

‘अग्निपथ’ योजनेच्या निषेधार्थ काँग्रेस रविवारी, १९ जून रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, पक्षाचे खासदार, कार्यकारिणी सदस्य आणि दिग्गज नेते या सत्याग्रहात सहभागी होणार आहेत.

मोदींना ‘माफीवीर’ बनावे लागेल - राहुल

दुसरीकडे, राहुल गांधी यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी लिहिले की, सलग 8 वर्षे भाजप सरकारने जय जवान, जय किसानच्या मूल्यांचा अपमान केला आहे. पंतप्रधानांना काळा शेती कायदा मागे घ्यावा लागेल, असे मी यापूर्वीही म्हटले होते. त्याचप्रमाणे त्यांना माफीवीर बनून देशातील तरुणांचे म्हणणे मान्य करावे लागेल आणि अग्निपथ परत घ्यावी लागेल.

logo
marathi.freepressjournal.in