सोनीकडून झी एंटरटेन्मेंटसोबतचा विलीनीकरण करार रद्द; अटींची पूर्तता न केल्यामुळे घेतला निर्णय

या घोषणेनंतर दोन वर्षांनी झी-सोनी विलीनीकरणाचा करार रद्द करण्यात आला आहे.
सोनीकडून झी एंटरटेन्मेंटसोबतचा विलीनीकरण करार रद्द; अटींची पूर्तता न केल्यामुळे घेतला निर्णय
Published on

वृत्तसंस्था/नवी दिल्ली : कल्वर मॅक्स एंटरटेन्मेंटने (पूर्वीची सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया - एसपीएनआय) झी एंटरटेन्मेंटसोबतचा विलीनीकरण करार रद्द केला आहे. याबाबत सोनी यांनी संबध यांना पत्र पाठवून माहिती दिली आहे. अटींच्या कथित उल्लंघनामुळे झी लि.कडून ९० दशलक्ष डॉलर अर्थात सुमारे ७४८ कोटी रुपयांच्या टर्मिनेशन फीची मागणी केली आहे. सोनीच्या या निर्णयामुळे गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली विलीनीकरणाची प्रक्रिया संपुष्टात आली आहे. दरम्यान, सोनीने विलीनीकरणाचा करार रद्द केल्यानंतर समूहाविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे झी समूहाने म्हटले आहे.

या घोषणेनंतर दोन वर्षांनी झी-सोनी विलीनीकरणाचा करार रद्द करण्यात आला आहे. झी आणि सोनीच्या विलीनीकरणाला स्टार आणि डिस्ने इंडियानंतरचे दुसरे सर्वात मोठे विलीनीकरण म्हटले गेले होते. या अंतर्गत, दोन ओटीटी प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त मनोरंजन, क्रीडा आणि प्रादेशिक बाजारपेठांमध्ये मजबूत उपस्थितीसह ७५ चॅनेल एकत्रित होण्याचा मानस व्यक्त केला होता. हा करार रद्द होणे म्हणजे झी आणि सोनी या दोघांनाही धक्का बसल्यासारखे आहे, आता पुढे काय होणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

२२ डिसेंबर २०२१ रोजी यासंदर्भातील विलीनीकरणाचा कारार करण्यात आल्याची घोषणा सोनी ग्रुप कॉर्पोरेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले होते. करारानुसार, विलीनीकरण २१ डिसेंबर २०२३ पूर्वी पूर्ण व्हायचे होते. त्यामध्ये नियामक आणि इतर मंजुरी यांचा समावेश होता आणि व्यवहार पूर्ण करण्यासाठी एक महिन्याच्या वाढीव कालावधीची मुभा होती. जर विलीनीकरण त्यांच्या स्वाक्षरीच्या तारखेनंतर २४ महिन्यांपर्यंत पूर्ण झाले नाही, तर दोन्ही कंपन्यांना वाजवी कालावधीपर्यंत विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आवश्यक अंतिम तारखेच्या विस्तारावर चर्चा करणे आवश्यक आहे, असे त्यात म्हटले आहे. निश्चित करारांमध्ये पुढे असे म्हटले आहे की, जर दोन्ही कंपन्या चर्चा कालावधीच्या शेवटी अशा मुदतवाढीवर सहमत होऊ शकत नसतील, तर कोणतीही कंपनी लेखी सूचना देऊन निश्चित करार संपुष्टात आणू शकतो, असे त्यात म्हटले आहे. सोनीने सुभाष चंद्रा कुटुंब-प्रचारित मीडिया आणि मनोरंजन कंपनी झी एंटरप्रायजेस लि. ला एक महिन्याचा वाढीव कालावधी संपल्यानंतर समाप्तीची नोटीस पाठवली.

गेल्या वर्षी १७ डिसेंबर रोजी झी एंटरप्रायजेस लि.ने कल्वर मॅक्स आणि बांग्ला एंटरटेन्मेंट प्रा. लि. (बीईपीएल) कडून २०२१ च्या करारानुसार अंतिम मुदत वाढवण्याची मागणी केली होती.

१९ डिसेंबर रोजी एसपीएनआयने सांगितले होते की, ते झी एंटरप्रायजेस लि.द्वारे अंतिम मुदत वाढवण्याच्या विनंतीला अद्याप सहमती दिलेली नाही. मात्र, एका दिवसानंतर या विषयावर चर्चा करण्याचे मान्य केले.

प्रस्तावित १० अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या विलीनीकरणाला आधीच सीसीआय, एनएसई, आणि बीएसई, कंपनीचे भागधारक आणि कर्जदारांकडून नियामक मंजुरी मिळाली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी) च्या मुंबई खंडपीठानेही विलीनीकरणाला मंजुरी दिली होती.

कायदेशीर कारवाई करणार : झी समूह

हा करार पूर्णत्वास आला असता तर कल्वर मॅक्स एंटरटेन्मेंट ही १० अब्ज डॉलर्सची कंपनी बनली असती. परंतु विलीनीकरण करार रद्द झाल्याने त्यास धक्का बसला आहे. सोनीने यासंदर्भात सोमवारी झी ला पत्र पाठवले असून लवकरच एक्स्चेंजला कळवण्याची अपेक्षा आहे. सोनीने करार रद्द करण्यामागे विलीनीकरणाच्या अटींची पूर्तता न केल्याचे कारण सांगितले. दरम्यान, सोनीने विलीनीकरणाचा करार रद्द केल्यानंतर समूहाविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे झी समूहाने म्हटले आहे. सोनी आणि झी यांच्यातील विलीनीकरणाचा करार रद्द करण्याच्या दरम्यान, झी समूहाचे एमडी पुनित गोएंका अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबासह दिसले.

logo
marathi.freepressjournal.in