
हारून शेख/ लासलगाव
श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयात शुल्क ३० टक्क्यावरून दहा टक्के केल्याने देशातील कांदा निर्यातीत वाढ होणार आहे. नाशिकसह देशातील सुमारे नऊ टक्के कांदा श्रीलंकेमध्ये निर्यात होतो, या निर्णयाने नाशिक जिल्ह्याबरोबरच राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. श्रीलंकन सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कांदा निर्यातदारांनी देखील स्वागत केले आहे. भारतीय कांदा श्रीलंकन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात निर्यात झाल्याने कांद्याला दरही चांगले मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरवर्षी साधारणपणे दीड ते दोन लाख मेट्रिक टन कांदा भारतातून श्रीलंकेत निर्यात होत असतो. मात्र श्रीलंकेने लावलेल्या निर्यात शुल्कामुळे काही प्रमाणात या निर्यातीला ब्रेक लागला होता. आता हा अडसर दूर झाल्याने निर्यातीचा वेग वाढेल,असे मत निर्यातदारांनी व्यक्त केले आहे.
बांगलादेशनंतर भारताचा सर्वांत मोठा कांदा निर्यातदार म्हणून श्रीलंका देशाकडे पाहिले जाते. श्रीलंकेने यापूर्वी कांद्याच्या आयातीवर ३० टक्के शुल्क आकारल्यामुळे भारतातून निर्यातीचे प्रमाण घटले होते. श्रीलंका सरकारने कांदा उत्पादकांसाठी घेतलेला निर्णय भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. २०२३ मध्ये एकट्या श्रीलंकेत ४१४ कोटींचा १ लाख ७३ हजार ७५४ मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यात आला होता. श्रीलंकेने घेतलेल्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भारतातील शेतकरीच नव्हे तर व्यापारी, मजूर, जहाज कंपन्यांना देखील याचा फायदा होणार असल्याचे फलोत्पादन निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी म्हटले आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक संपुष्टात आली असून मंगळवारी नवीन लाल कांद्याची आवक २१ हजार २३८ क्विंटल झाली. लाल कांद्याला प्रति क्विंटल जास्तीत जास्त ५३५२ रुपये प्रति क्विंटल तर सरासरी ३७५१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
आवकेत घट झाल्यामुळे सध्या बाजारात उपलब्ध कांद्याचे प्रमाण कमी आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने बाजार भाव टिकून आहे.
श्रीलंकेने कांदा आयातीवरील शुल्क २० टक्क्यांनी घटवून दहा टक्के केले आहे. भारताने निर्यातीवरील २०% शुल्क हटविण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील खासदारांना पत्र देण्याची भूमिका शेतकरी संघटनांनी व्यक्त केली. उन्हाळ कांदा संपुष्टात आला असून लाल खरीप कांद्याची आवक बाजार समितीमध्ये वाढत आहे. परंतु बाजारभावात अल्प प्रमाणात घसरण झाली आहे. सरासरी भाव ३७५१ रुपये असून लाल कांद्याची आवक वाढत असल्याने दर घसरण्याची शक्यता वाढली आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने निर्यात शुल्क पूर्णत: हटवावे, यासाठी नाशिक जिल्ह्यातील खासदारांना पत्र देणार आहोत.
भारत दिघोळे,
अध्यक्ष कांदा उत्पादक शेतकरी संघटना