चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्याचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविषयी वक्तव्यामुळे इंडिया आघाडीने देशातील ५ टक्के मते गमावली असल्याचे मत भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी व्यक्त केले आहे.
सनातन धर्माचे उच्चाटन केले पाहिजे, असे वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन यांनी नुकतेच केले होते. त्यावरून देशभरात गदारोळ माजला. त्यानंतरही उदयनिधी यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम राहत मी पुन्हा पुन्हा असेच वक्तव्य करेन, असे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना अण्णामलाई यांनी म्हटले आहे की, स्टॅलिन यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीने देशातील किमान ५ टक्के मते गमावली आहेत. उदयनिधी स्टॅलिन यांनी अशीच वक्तव्ये करत राहावे, म्हणजे आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीची किमान २० टक्के मते तरी घटतील, अशी मल्लिनाथीही अण्णामलाई यांनी केली आहे.
राज्यातील स्टॅलिन सरकारने गेल्या अनेक वर्षांत भ्रष्टाचाराचा कहर केला आहे. त्यामुळे जनता त्यांच्या कारभाराला विटली आहे. म्हणूनच जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी स्टॅलिन अशी वक्तव्ये करत आहेत, असा आरोपही अण्णामलाई यांनी केला.
सरन्यायाधीशांना २६२ जणांचे पत्र
सनातन धर्माविरुद्ध वक्तव्य करणारे उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर अवमानाचा खटला भरवला जावा, अशी मागणी करणारे पत्र देशातील २६२ प्रभावशाली नागरिकांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना लिहिले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी एका जाहीर कार्यक्रमात सनातन धर्माचे उच्चाटन केले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. त्यावर आक्षेप घेत देशातील महत्त्वाच्या नागरिकांनी हे पत्र लिहिले आहे. त्यात माजी न्यायाधीश, वकील, सरकारी आणि संरक्षण दलांतील निवृत्त अधिकारी आदींचा समावेश आहे. प्रक्षोभक भाषणे (हेट स्पीच) करणाऱ्यांवर राज्य सरकारने तक्रार दाखल होण्याची वाट न पाहता आपण होऊन कारवाई करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्याचा आधार घेऊन ही मागणी करण्यात आली आहे. स्टॅलिन यांच्या वक्तव्याने बहुसंख्य हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. हे वक्तव्य 'हेट स्पीच' मानले जाऊन स्टॅलिन यांच्यावर अवमानाची कारवाई केली जावी, असे पत्र लिहिणाऱ्यांनी म्हटले आहे.