जेहानाबाद : बिहारच्या जेहानाबाद येथील बाबा सिद्धेश्वरनाथ मंदिरात रविवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत सहा महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर १६ जण जखमी झाले आहेत.
प्यारे पासवान (३०), निशा देवी (३०), पूनम देवी (३०), निशा कुमारी (२१) आणि सुशीला देवी (६४) अशी मृतांची नावे असून एका महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. “श्रावण महिन्यात शंकराचे दर्शन घेण्यासाठी रविवारी रात्री मोठी गर्दी जमली होती. रविवारी रात्री ११.३० वाजता चेंगराचेंगरी झाली, मात्र मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी या परिस्थितीवर लवकरच नियंत्रण मिळवले. मृतांमध्ये कावड यात्रेकरूंचा सहभाग आहे,” असे जिल्हा दंडाधिकारी अलंक्रिता पांडे यांनी सांगितले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमी भाविकांना सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचना केल्या आहेत. जखमींना मुकंदपूर आणि जवळच्या परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी १० भाविकांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सहा जण अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत.