नवी दिल्ली : अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा प्रदाता स्टारलिंकचे भारतात फक्त २० लाख कनेक्शन असू शकतात, असे केंद्रीय मंत्री पेम्मासनी चंद्र शेखर यांनी सोमवारी सांगितले. त्यांनी सरकारी बीएसएनएल आणि इतर दूरसंचार कंपन्यांना धोका नसल्याचे या निवेदनातून अधोरेखित केले. दूरसंचार राज्यमंत्री येथे बीएसएनएलच्या आढावा बैठकीच्या वेळी बोलत होते.
स्टारलिंकचे भारतात फक्त २० लाख ग्राहक असू शकतात आणि ते २०० एमबीपीएसपर्यंत गती देऊ शकतात. याचा दूरसंचार सेवांवर परिणाम होणार नाही. सॅटकॉम सेवा ग्रामीण आणि दुर्गम भागांना लक्ष्य करतील, अशी अपेक्षा आहे जिथे बीएसएनएलची उपस्थिती लक्षणीय आहे, असे मंत्री म्हणाले
ते म्हणाले की, सॅटकॉम सेवांसाठी आगाऊ खर्च खूप जास्त असेल आणि मासिक खर्च सुमारे ३,००० रुपये असू शकतो. मंत्र्यांनी सांगितले की बीएसएनएलची ४जी सेवा सुरू झाली झाली आहे आणि सध्या दर वाढवण्याची त्यांची योजना नाही. आम्हाला प्रथम बाजारपेठ हवी आहे. कोणतेही दर वाढवण्याचे नियोजन नाही.