
श्रीनगर : काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या तीन पक्षांच्या घराणेशाहीच्या राजकारणाची सद्दी संपुष्टात आणण्यासाठी भाजपला मतदान करा. संसदेत आश्वासन दिल्याप्रमाणे आम्ही जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा देऊ. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये ‘कलम ३७०’ पुनर्स्थापित करू शकेल अशी पृथ्वीतलावर कोणतीही शक्ती नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक प्रचारसभांमध्ये केले.
श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर झालेल्या सभेत मोदी पुढे म्हणाले की, यापुढे जम्मू-काश्मीरमधील युवक असहाय्य राहणार नाही, मोदी सरकारच्या राजवटीत ते सक्षम होतील, गेल्या पाच वर्षांत येथील स्थिती बदलली आहे. लोकशाही प्रक्रियेबद्दल युवकांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे आणि हा विश्वासच युवकांच्या सक्षमीकरणाचे पहिले पाऊल आहे.
विधानसभेची ही निवडणूक जम्मू-काश्मीरचे भवितव्य ठरविण्यासाठीची आहे. काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्सने नद्यांचे पाणी पाकिस्तानकडे वाहू दिले, मात्र आम्ही धरणे बांधली. जम्मूच्या बहुक्षेत्री विकासाला भाजप बांधील आहे. काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीने अनेक वर्षे त्याकडे दुर्लक्ष केले. आता ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर फुटीर कारवाया, दहशतवाद ओसरू लागला आहे, आता त्याचा पूर्णपणे बीमोड केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्याला पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी पाठिंबा दिला. हे पक्ष पाकिस्तानच्या अजेंड्याची अंमलबजावणी करीत आहेत, मात्र आम्ही पाकिस्तानच्या अजेंड्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले.
भाजप सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना वार्षिक १० हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले जाईल, महिला कुटुंबप्रमुखांना वार्षिक १८ हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले जाईल आणि आरोग्य विमाकवच पाच लाखांवरून सात लाख रुपये केले जाईल. जम्मू-काश्मीरची वेगाने प्रगती आणि झपाट्याने विकास हे आमच्या सरकारचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.