

नवी दिल्ली: या आठवड्यात शेअर बाजाराची वाटचाल राज्य विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि पश्चिम आशियातील संकटामुळे वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींवरून निश्चित होईल, असे विश्लेषकांनी सांगितले. पश्चिम आशियातील घडामोडी आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील परिस्थितीवरही गुंतवणूकदारांचे लक्ष असेल. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी ४ मे रोजी सुरू होईल.
'लिव्हलॉन्ग वेल्थ'चे संशोधन विश्लेषक आणि संस्थापक हरिपसाद के. म्हणाले की, केंद्रातील सत्ताधारी पक्ष पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसकडून सत्ता हस्तगत करू शकतो का, भारतीय जनता पक्ष केरळ आणि तामिळनाडूमध्ये कसा प्रवेश करतो, यावर गुंतवणूकदारांचे लक्ष असेल. तेलाच्या किमती हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे ब्रेंट क्रूडचे दर उच्च पातळीवर राहिल्याने महागाईचा धोका कायम आहे. भारतासारख्या आयात आधारित अर्थव्यवस्थेसाठी तेलाच्या उच्च किमतींमुळे रुपयावर दबाव येतो आणि कंपन्यांच्या नफ्यावरही परिणाम होतो.
मॅक्रोइकॉनॉमिक डेटा, चौथ्या तिमाहीचे निकाल आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या व्यवहारांचा बाजारावर प्रभाव पडेल. 'रिलागेअर ब्रोकिंग लिमिटेड'चे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी नमूद केले की, अमेरिका-इराणमधील तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहिल्यामुळे तेलाच्या किमती अस्थिर राहतील.
पीएमआय, या आठवड्यात 'एचएसबीसी' मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस आणि कंपोझिट पीएमआय आणि परकीय चलन साठ्याची आकडेवारी जाहीर होणार आहे. या आठवड्यात 'अंबुजा सिमेंट्स', 'भेल', 'हिरो मोटोकॉर्प', 'महिंद्रा अँड महिंद्रा' आणि 'बजाज ऑटो' यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत.
चार कंपन्यांचे बाजार भांडवल वाढले; रिलायन्सचा सर्वाधिक लाभ
सुट्ट्यांमुळे व्यवहाराचे दिवस कमी असलेल्या गेल्या आठवड्यात देशातील १० सर्वाधिक मूल्यवान कंपन्यांपैकी चौघांचे एकत्रित बाजार मूल्य २.२० लाख कोटी रुपयांनी वाढले; यामध्ये 'रिलायन्स इंडस्ट्रीज'ला सर्वाधिक फायदा झाला. या कंपन्यांच्या समूहामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि बजाज फायनान्स या कंपन्यांना फायदा झाला; तर एचडीएफसी बैंक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपन्यांच्या बाजार मूल्यात एकत्रितपणे १.२४ लाख कोटी रुपयांची घट झाली. 'रिलायन्स इंडस्ट्रीज'च्या बाजार मूल्यात १,३९,६५५.८ कोटी रुपयांची भर पडली. तिचे एकूण बाजार मूल्य १९,३६,३०३.३० कोटी रुपयांवर पोहोचले. भारती एअरटेलचे बाजार मूल्य ४३,५०३.५१ कोटी रुपयांनी वधारून ११,४९,२२२.१३ कोटी रुपयांवर पोहोचले.