कोलकात्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले; डॉक्टर बलात्कार व हत्याप्रकरणी ममतांच्या राजीनाम्याची मागणी

आर. जी. कर रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार व हत्याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात १०० जण जखमी झाले.
कोलकात्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले; डॉक्टर बलात्कार व हत्याप्रकरणी ममतांच्या राजीनाम्याची मागणी
PTI
Published on

कोलकाता : येथील आर. जी. कर रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार व हत्याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात १०० जण जखमी झाले. या आंदोलकांवर पोलिसांनी अश्रूधुराचा मारा करताच संतापलेल्या जमावाने दगडफेक केली.

कोलकात्यातील एम. जी. रोड व हास्टींग रोड आदी परिसरात पोलीस व आंदोलकांच्या चकमकी झडल्या. यात अनेक पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचे फवारेही मारले. आम्हाला पोलीस का मारत आहेत? आम्ही कोणताही कायदा मोडला नाही. पीडित डॉक्टरला न्याय मिळण्यासाठी आम्ही शांततेत रॅली काढत आहोत, असे आंदोलकांचे म्हणणे होते.

शेकडो तरुणांनी मंगळवारी शहराच्या दोन भागातून जोरदार आंदोलन सुरू केले. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केला व त्यांच्यावर अश्रूधुराचा मारा केला. या आंदोलकांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची, तसेच या घटनेतील जबाबदारी लोकांना अटक करण्याची मागणी केली.

कोलकाता येथे निवासी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांमध्ये आंदोलनाची धग पेटली. फेसबुक पोस्टवरून सुरू झालेले हे आंदोलन रस्त्यावर आले आहे. या विद्यार्थ्यांच्या ३ प्रमुख मागण्या आहेत. त्यात निर्भयासाठी न्याय, गुन्ह्यातील आरोपीला फाशी आणि ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा, यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांची पॉलिग्राफ चाचणी करा - भाटिया

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पोलीस आयुक्तांची पॉलिग्राफ टेस्ट व्हायला हवी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केली आहे. नबन्ना येथील विद्यार्थ्यांची रॅली रोखल्याबद्दल ममता सरकारवरही त्यांनी हल्लाबोल केला. जे सत्याच्या पाठीशी उभे आहेत त्यांच्यावर पोलीस कारवाई करत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पश्चिम बंगालमध्ये हुकूमशाही पाहायला मिळत आहे. आंदोलन शांततेत होत आहे, पण ममता हुकूमशहा असून, त्यांची भूमिका आरोपींना पाठीशी घालण्याची आहे. बंगालमध्ये माता-भगिनी सुरक्षित नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

भाजपची ‘प. बंगाल बंद’ची हाक

पश्चिम बंगाल सचिवालयावर विद्यार्थ्यांकडून नेण्यात येणाऱ्या शांततापूर्ण मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या निषेधार्थ बुधवारी भाजपने १२ तासांच्या ‘पश्चिम बंगाल बंद’ची हाक दिली आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी दिली. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारले, अश्रूधूर सोडला, लाठीमार केला. पोलिसांची ही कृती अयोग्य आहे. या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in