

नागपूर : ‘नीट’ परीक्षा रद्द झाल्याच्या धक्क्यातून मध्य प्रदेशातील एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने नागपुरात आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. आकांक्षा चतुर्वेदी असे या विद्यार्थिनीचे नाव असून, आत्महत्येनंतर काही दिवसांनी तिच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत तिने आपल्या पालकांची माफी मागितली असून, पुन्हा परीक्षा देण्याचे धाडस माझ्यात नाही, असे नमूद केले आहे.
‘नीट’ परीक्षा २१ जून रोजी पुन्हा होणार आहे. आकांक्षाला पहिल्या परीक्षेत चांगले गुण मिळण्याची आशा व्यक्त केली होती, मात्र परीक्षा रद्द झाल्याच्या निर्णयामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती. पहिल्या परीक्षेत चांगले गुण मिळत होते, पण दुसऱ्या परीक्षेत पुन्हा तेवढेच गुण मिळतील याची खात्री नाही आणि मी तुमचे सगळे स्वप्न धुळीस मिळवले, असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे.
नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी १ जून रोजी ही चिठ्ठी ताब्यात घेतली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी दिली. आकांक्षाचे वडील नागपुरात आचारी म्हणून काम करून तिच्या शिक्षणाचा खर्च उचलत होते. पहिल्या परीक्षेनंतर ६५० पेक्षा जास्त गुण मिळतील असा विश्वास तिने व्यक्त केला होता, परंतु परीक्षा रद्द झाल्यापासून तिच्या वर्तनात मोठा बदल झाला होता, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.