दिल्लीतील मुखर्जी नगरमध्ये एका खासगी कोचिंग सेंटरमध्ये गुरुवारी दुपारी आग लागल्याने मोठा गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ११ गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. कोचिंक सेंटरला आग लागताच इमारतीतील विद्यार्थी दोरीच्या सहाय्याने खाली उतरताना दिसले. काही विद्यार्थ्यांनी तर खिडकीतून उड्या देखील मारल्या. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीमुळे कोणालाही इजा झालेली नाही. मात्र, आग लागल्याने खिडकीतून उड्या मारणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. आग लागल्याची घटना घडली त्यावेळी कोचींगमध्ये सुरु असलेल्या वर्गात ४०० विद्यार्थी होते.
अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं असून इमारतीतून विद्यार्थ्यांना पूर्णपणे बाहेर काढण्यात आलं आहे. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. खिडकीमधून उड्या मारणारे चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. मुखर्जीनगर हे दिल्लीतील कोचिंग सेंटर हब असून याठिकाणी स्पर्धा परिक्षा तसंच इतर कोचिंग क्लासेस मोठ्या प्रमाणात आहेत.