वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग वाढतोय; ‘लॅन्सेट’च्या संशोधनातील निष्कर्ष

धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला कर्करोग होतो, असे अनेक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यासाठी सिगारेटच्या पाकिटावर प्रतिबंधात्मक इशारे दिले जातात.
वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग वाढतोय; ‘लॅन्सेट’च्या संशोधनातील निष्कर्ष
Published on

नवी दिल्ली : धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला कर्करोग होतो, असे अनेक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यासाठी सिगारेटच्या पाकिटावर प्रतिबंधात्मक इशारे दिले जातात. पण, धूम्रपान न करताही अनेक व्यक्तींमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग वाढत असल्याचे दिसून आले आहे. वायू प्रदूषणामुळे हा कर्करोग वाढत आहे, असे संशोधन ‘लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन जर्नल’मध्ये मंगळवारी प्रकाशित झाले आहे.

‘जागतिक कर्करोग दिना’निमित्त हे संशोधन प्रकाशित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संशोधकांनी ‘ग्लोबल कर्करोग वेधशाळा २०२२’च्या डेटासह विविध आकडेवारीचा अभ्यास केला. त्यांनी फुफ्फुसाच्या कर्करोगाचे चार उपप्रकार- ॲडेनोकार्सिनोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, स्मॉल-सेल आणि लार्ज-सेल कार्सिनोमा यांचा अभ्यास केला.

ॲडेनोकार्सिनोमा : जो म्युकस आणि पचन रस तयार करणाऱ्या ग्रंथींमध्ये सुरू होतो. हा पुरुष आणि महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. २०२२ मध्ये धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये ५३% ते ७०% फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या घटना ॲडेनोकार्सिनोमामुळे झाल्या आहेत.

संशोधकांच्या मते, इतर उपप्रकारांच्या तुलनेत ॲडेनोकार्सिनोमाचा धोका धूम्रपानाशी तुलनेने कमी संबंधित आहे. धूम्रपानाच्या प्रमाणात घट होत असताना, धूम्रपान न करणाऱ्या लोकांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, असे संशोधकांनी नमूद केले. वायू प्रदूषण आणि धूम्रपानाच्या पद्धतींमधील बदल हे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या वाढत्या घटनांचे प्रमुख कारण ठरू शकतात, असे याबाबतच्या संशोधनाचे मुख्य लेखक फ्रेडी ब्रे यांनी स्पष्ट केले.

ॲडेनोकार्सिनोमा प्रकारातील कर्करोग सर्वाधिक

२०२२ मध्ये ९,०८,६३० महिलांना फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान झाले. त्यापैकी ५,४१,९७१ (५९.७%) केसेस अॅडेनोकार्सिनोमा प्रकारातील होत्या. ॲडेनोकार्सिनोमामुळे ग्रस्त झालेल्या महिलांमध्ये ८०,३७८ घटना वायू प्रदूषणामुळे झाल्या असाव्यात, असा संशय आहे.

जगातील संपूर्ण लोकसंख्या खराब हवेच्या ठिकाणी राहतेय

२०१९ पर्यंत, जगातील जवळपास संपूर्ण लोकसंख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या हवेच्या दर्जाच्या निकषांनुसार खराब ठिकाणी राहत आहे. फ्रेडी ब्रे यांच्या मते, धूम्रपान प्रतिबंध आणि वायू प्रदूषण नियंत्रणाची धोरणे ही उच्च-जोखीम असलेल्या लोकांसाठी योग्य पद्धतीने तयार करणे आणि अंमलात आणणे आवश्यक आहे.

logo
marathi.freepressjournal.in