अलीकडच्या काळात रिल्स किंवा शॉर्ट्स लोकप्रिय आहेत. बरेच लोक आता Instagram आणि YouTube Reels वर व्हिडिओ बनवण्यास प्राधान्य देत आहेत. रिल्स पाहणाऱ्यांची संख्या जसजशी वाढत आहे, तसतशी व्हिडिओ बनवणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
असं असलं तरी आपले व्हिडिओ लोकप्रिय व्हावेत, यासाठी अनेक जण धोकादायक मार्गांचा वापर करतात. त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागतात. असाच धोकादायक स्टंट करणाऱ्या एका तरूणाला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. दोन धावत्या महिंद्रा कारच्या छतावर उभे राहून धोकादायक स्टंट केल्याबद्दल आणि त्याचा व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केल्याबद्दल पोलिसांनी त्याला अटक केली.
ismailchoudhary0041 या इन्स्टा आयडीवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला ५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तरुणानं हा व्हिडिओ पोस्ट करताच तो व्हायरल झाला. हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं संबंधित तरुणाला अटक केली. दोन समांतर चालणाऱ्या महिंद्रा थारच्या छतावर उभं राहून हा तरुण स्टंट करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हा स्टंट अतिशय धोकादायक असून छोटीशा चूकीमुळं मोठी दुर्घटना घडू शकली असती. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणानं हा व्हिडिओ राजस्थानच्या एका राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्यामध्ये शूट केला आहे.