इस्रोकडून नवीन बॅटरीची यशस्वी चाचणी; सिलिकॉन-ग्रॅफाइट ॲनोडवर आधारित किफायतशीर, प्रभावी तंत्रज्ञान

कृत्रिम उपग्रहांवरील विविध उपकरणांना ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी बॅटरींचा वापर केला जातो.
इस्रोकडून नवीन बॅटरीची यशस्वी चाचणी; सिलिकॉन-ग्रॅफाइट ॲनोडवर आधारित किफायतशीर, प्रभावी तंत्रज्ञान

बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नव्याने विकसित केलेल्या बॅटरीची चाचणी यशस्वी ठरली असून त्यामुळे भविष्यात कृत्रिम उपग्रह आणि जमिनीवरील उपकरणांमध्येही त्यांच्या वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. हे तंत्रज्ञान सिलिकॉन-ग्रॅफाइट ॲनोडवर आधारित असून ते किफायतशीर आणि अधिक प्रभावी आहे.

कृत्रिम उपग्रहांवरील विविध उपकरणांना ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी बॅटरींचा वापर केला जातो. या बॅटरी विविध प्रकारच्या असतात. सध्या त्यात प्रामुख्याने लिथियम आयन बॅटरींचा वापर केला जातो. या बॅटरींचा ॲनोड बनवण्यासाठी केवळ ग्रॅफाइटचा वापर केला जातो. इस्रोने विकसित केलेल्या नवीन लिथियम आयन बॅटरीत नुसत्या ग्रॅफाइटऐवजी सिलिकॉन-ग्रॅफाइट कॉम्पोझिट ॲनोड मटेरिअलचा वापर केला आहे. त्यामुळे ॲनोडवर अधिक प्रमाणात लिथियमचे आयन मावतात आणि बॅटरीची कार्यक्षमता वाढते. साधारण ४.२ ते २.८ व्होल्टेजवर कार्यरत असताना लिथियम आयन सेलची ऊर्जा घनता (एनर्जी डेन्सिटी) १५७ वॅट तास प्रति किलोग्रॅम असते. त्या तुलनेत सिलिकॉन-ग्रॅफाइट ॲनोड वापरलेल्या बॅटरीची ऊर्जा घनता १९० वॅट तास प्रति किलोग्रॅम असते. इतकेच नव्हे, तर या बॅटरीच्या निर्मितीत सध्या उपलब्ध असलेल्या आणि किफायतशीर अन्य सामग्रीचाही वापर केला आहे. त्यामुळे बॅटरीजे वस्तुमानही ३५ ते ४० टक्क्यांनी घटणार आहे.

इस्रोच्या विविध प्रयोगशाळांतर्फे विकसित करण्यात आलेल्या कोणत्याही उपक्रमाच्या प्रत्यक्ष अंतराळातील प्रवासात चाचण्या घेतल्या जातात. त्यानंतरचा त्यांच्या वापराचा निर्णय घेतला जातो. त्यानुसार या नव्या बॅटरीची चाचणी इस्रोने १ जानेवारी रोजी प्रक्षेपित केलेल्या पीएसएलव्ही सी-५८ प्रक्षेपकावर बसवलेल्या पोएम-३ या उपकरणावर घेण्यात आली. याच प्रक्षेपकावरून भारताने नववर्षाच्या पहिल्या दिवशी कृष्णविवरे आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी एक्स्पोसॅटचे प्रक्षेपण केले. या चाचणीवेळी बॅटरीने २१ तासांत पृथ्वीभोवती १५ प्रदक्षिणा केल्या. त्यात बॅटरीने आपली कार्यक्षमता सिद्ध केली. आता या बॅटरींच्या व्यापक वापराचा मार्ग मोकळा झाला आहे.

आदित्य एल-१ आज लक्ष्यावर

भारताचे आदित्य एल-१ हे सौरयान आज (६ जानेवारी) अंतराळातील लाग्रान्ज १ या बिंदूवर पोहोचणार आहे. इस्रोने २ सप्टेंबर २०२३ रोजी प्रक्षेपित केलेले हे यान १२५ दिवसांत सूर्याच्या दिशेने १५ लाख किमीचा प्रवास पूर्ण करून त्याच्या लक्ष्यावर पोहोचत आहे. या यानाद्वारे सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे. अंतराळात पाच लाग्रान्ज बिंदू असून तेथे यान स्थापित केल्यास ते बरेचसे स्थिर राहून अभ्यासात मदत होते. दरम्यान, भारताने १ जानेवारी २०२४ रोजी प्रक्षेपित केलेल्या एक्स्पोसॅटचे कामकाजही योग्य प्रकारे सुरू असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in