Wayanad landslide: चार मुलांसह सहा आदिवासींना वाचविण्यात यश; मृतांचा आकडा ३६१ वर

केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनानंतर विविध पथकांमार्फत बचावकार्य वेगाने सुरू आहे. शनिवारी केर‌ळ वन विभागाने या भागातून चार मुलांसह सहा आदिवासींना वाचविले. हे सर्वजण भूस्खलनानंतर एका गुहेत अडकले होते.
Wayanad landslide: चार मुलांसह सहा आदिवासींना वाचविण्यात यश; मृतांचा आकडा ३६१ वर
X
Published on

वायनाड : केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनानंतर विविध पथकांमार्फत बचावकार्य वेगाने सुरू आहे. शनिवारी केर‌ळ वन विभागाने या भागातून चार मुलांसह सहा आदिवासींना वाचविले. हे सर्वजण भूस्खलनानंतर एका गुहेत अडकले होते.

कलपेट्टा रेंजचे वन अधिकारी के. हशीस यांच्या नेतृत्वाखाली चार जणांच्या टीमने या आदिवासी कुटुंबाला वाचविले. त्यात एक ते चार वर्षीय चार मुले आहेत. या बचावकार्याला साडेचार तास लागले. हशीस यांनी सांगितले की, हे कुटुंब वायनाडमधील पनिया समुदायातील आहे. भूस्खलनानंतर हे कुटुंब डोंगराळ भागात असलेल्या एका गुहेत अडकले होते. नव्हरा आणि मुलांकरिता जेवणाच्या शोधात असलेली महिला आणि तिचा चार वर्षांचा मुलगा दिसला. त्यानंतर हे बचावकार्य करण्यात आले.

मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी वनविभागाच्या या यशस्वी मोहिमेसाठी त्यांची पाठ थोपटली. पिनाराई यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, भूस्खलन प्रभावित वायनाडमध्ये आमच्या शूर वन अधिकाऱ्यांद्वारे ८ तासांच्या ऑपरेशननंतर सहा आदिवासींचा जीव वाचविण्यात यश आले. एकत्र येत आम्ही आणखी ताकदीने उभे राहू अशी अपेक्षा आहे. वायनाडमध्ये आदिवासी समुदायाच्या अनेक लोकांना वन विभागाने सुरक्षित ठिकाणी पोहचवले आहे.

मुख्यमंत्री विजयन यांनी सांगितले की, वायनाडमध्ये बचावकार्य आणि शोधमोहीम अखेरच्या टप्प्यात आहे. २०६ जण अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्यासाठी लष्कर, एनडीआरएफ, फॉरेस्ट, पोलीस, पॅरामिलिट्री आणि स्वयंसेवकांसह १४०० जण कार्यरत आहेत.

मुंडक्कई, चूरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा गावांतील बचावकार्य पूर्ण झाल्याची माहिती लष्कराने १ ऑगस्टला दिली. आता केवळ ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना शोधण्याचे कार्य सुरू आहे. काही ठिकाणी २० ते ३० फुटांपर्यंत मृतदेह गाडले गेल्याची शक्यता आहे.

मृतांचा आकडा ३६१ वर

वायनाडमधील बचावकार्य शनिवारी पाचव्या दिवशीही सुरू होते. एनडीआरएफसह एकूण ४० टीम या बचावकार्यात सहभागी झाल्या आहेत. शनिवारपर्यंत या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३६१ वर पोहचला आहे. या सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन झाले आहे. त्यातील २१८ मृतदेहांची ओळख पटली आहे. १४३ मृतदेहांचे केवळ तुकडे सापडले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in