सूचना भावूक; पण, खातेय फिश करी, चिकन अन् सँडवीचही!

कोठडीत ती चहा, कॉफी घेत असल्याचे तसेच फिश करी राईस, चिकन थाळी आणि सँडवीचही खात असल्याची माहिती खुद्द पोलिसांनीच दिली आहे.
सूचना भावूक; पण, खातेय फिश करी, चिकन अन् सँडवीचही!

 प्रतिनिधी। गोवन वार्ता 

म्हापसा : स्वत:च्या चार वर्षांच्या मुलाचा खून केल्याचा संशय असलेली सूचना सेठ शुक्रवारी घटनास्थळी गेल्यानंतर भावूक झाली. परंतु, कोठडीत असताना ती चहा, कॉफी घेत असल्याचे तसेच फिश करी राईस, चिकन थाळी आणि सँडवीचही खात असल्याची माहिती खुद्द पोलिसांनीच दिली आहे.

सूचना सेठ सध्या कोठडीत आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या चौकशीतून सूचनानेच मुलाचा खून केल्याचा संशय पोलिसांचा आहे. पण, मुलाचा खून आपण केलेला नाही. झोपेतच त्याचा नैसर्गिकरीत्या मृत्यू झाल्याचे ती सांगत असल्यामुळे पोलिसही​ चक्रावले आहेत.

शनिवारी ६ जानेवारी रोजी रात्री ११.३० च्या सुमारास सूचना मुलासोबत कांदोळीतील गेस्ट हाऊसमध्ये पोहोचली. विमानाने ती मोपा विमानतळावर उतरली होती. विमानाची तिकीटे तिने स्वत:च बूक केली होती. गेस्ट हाऊसमध्ये चेक-इन केल्यापासून ती एकटीच मुलासोबत होती. बाहेरची दुसरी कोणतीच व्यक्ती खोलीमध्ये गेली नाही, असे आतापर्यंतच्या पोलीस तपासातून समोर आले आहे.

मुलाचा मृतदेह असलेल्या बॅगसोबत सूचना पोलिसांना रंगेहाथ सापडली. त्यावेळी पोलिसांना सापडलेल्या सुसाईट नोटमध्ये तिने लिहिलेल्या मजकुरातून मुलाचा खून का व कशासाठी केला, याचा उलगडाही होतो. या सर्व मुद्यांनुसार पोलीस तिच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहेत.

जायचे होते पाळोळेला; पोहोचली कांदोळीत
संशयित सूचना यापूर्वी अनेकदा पर्यटन व कामानिमित्त मुलासोबत गोव्यात आली होती. घटना घडली तेव्हा तिला पाळोळेमध्ये जायचे होते. पण तिथे हॉटेलची बुकिंग तिला मिळाले नाही. त्यामुळे तिने कांदोळीमध्ये हॉटेलची खोली बूक केली, असे सूत्रांनी सांगितले.

पती व्यंकटरामन आज गोव्यात
सूचनाचा पती व्यंकटरामण शनिवारी (१३ जानेवारी) गोव्यात दाखल होणार आहे. तो सकाळच्या सत्रात कळंगुट पोलीस स्थानकावर दाखल होईल. व्यंकटरामण याला पोलिसांनी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी केले होते. तर शनिवारी सूचनाला पुन्हा नियमित वैद्यकीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत नेले जाणार आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.            

logo
marathi.freepressjournal.in