तब्बल १२ तासांच्या प्रवासात सूचनाचे गूढ मौन, टॅक्सीचालकाने उलगडली सूचना सेठची मानसिक अवस्था : निर्विकारपणे केला प्रवास

तब्बल १२ तासांच्या टॅक्सी प्रवासात सूचना सेठने गूढरीत्या मौन बाळगले होते. हॉटेल सोडतानाच तिच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या.
सूचना सेठ आणि टॅक्सीचालक रेजॉन डिसोझा
सूचना सेठ आणि टॅक्सीचालक रेजॉन डिसोझा

न्यूज डेस्क | गोवन वार्ता

पणजी : तब्बल १२ तासांच्या टॅक्सी प्रवासात सूचना सेठने गूढरीत्या मौन बाळगले होते. हॉटेल सोडतानाच तिच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. पुढच्या प्रवासात तिच्याबाबतचा संशय बळावल्याने आणि पोलिसांनीही माहिती दिल्याने टॅक्सी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील पोलीस स्टेशनवर नेली, अशा शब्दांत टॅक्सीचालक रेजॉन डिसोझा याने प्रवासातील थरारक घटनाक्रम कथन केला.

कांदोळीच्या ‘सोल बनियन ग्रँड’मधून रात्री साडेबारा वाजता मला फोन आला. एका महिलेला तातडीने बंगळुरूला टॅक्सी सोडायचे आहे, असा संदेश तिथून देण्यात आला. लांबचा प्रवास असल्याने मी सोबत एका मित्राला घेतले. हॉटेलमधून तिने आपली बॅग टॅक्सीत ठेवायला सांगितले. मी बॅग उचलली, मात्र ती बरीच जड असल्याचे लक्षात आले. त्याबाबत तिला विचारले असता, तिने आत दारूच्या बाटल्या असल्याचे सांगितले. मग आम्ही बॅग टॅक्सीत ठेवून प्रवासाला सुरुवात केली.

आधी घाई, ट्राफिक जाममध्ये रिलॅक्स...

सूचना हिला बंगळुरूला जाण्याची घाई होती. मात्र संपूर्ण प्रवासात ती शांत आणि मौन होती. एकदाच तिने पाण्याची बाटली घेण्यासाठी टॅक्सी थांबवण्यास सांगितले होते. शिवाय गोवा-कर्नाटक सीमेवरील चोर्ला घाटात चार तासांच्या वाहतूक कोंडीच्या वेळीही ती शांत होती. त्यावेळी मी तिला सांगितले की, ही वाहतूक कोंडी सुटायला ५-६ तास लागतील. तिची इच्छा असेल तर मी यू-टर्न घेऊन तिला विमानतळावर सोडू शकतो. तिने त्यास नकार दिला आणि ट्राफिक सुरळीत झाल्यावर आम्ही जाऊ, असे ती म्हणाली. मला तिचे हे वागणे थोडे विचित्र वाटले. कारण सुरुवातीला तिला बंगळुरूला जायची घाई होती आणि चोर्ला घाटात रहदारी ठप्प असूनही तिला अजिबात चिंता वाटत नव्हती, असे रेजॉन डिसोझा याने सांगितले.

पाच तास अडकून पडल्यानंतर प्रवास पुन्हा सुरू... 

रात्री १.३० ते पहाटे ६.१५ असे पाच तास अम्ही अडकून पडलो होतो. आम्ही कर्नाटक सीमा ओलांडल्यानंतर सकाळी १०.४५ वाजता गोव्यातून कळंगुट पोलिसांचा फोन आला. आम्ही कोकणीतून बोलत होतो, त्यामुळे त्या महिलेला काहीच कळत नव्हते. ज्या महिलेला आम्ही घेऊन जात होतो, त्या महिलेच्या हॉटेलमधील खोलीत रक्ताचे डाग आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिच्यासोबत मूल असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. कारण ती निघून गेली, तेव्हा तिथे मूल नव्हते. दरम्यान, त्यांनी माझ्या फोनवरून त्या महिलेशी संवाद साधला. नंतर मला पोलिसांकडून आणखी एक कॉल आला. त्यांनी सांगितले की, त्या महिलेने आपला मुलगा एका घरात ठेवल्याचे सांगून पत्ता आणि इतर तपशील दिले होते, जे खोटे असल्याचे आढळून आले आहे. तिने दिलेला मोबाईल क्रमांकही चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मला खात्री पटली की​ काही तरी यात काळेबेरे असावे. त्यानंतर पोलिसांनी फोनवरून मला जवळच्या पोलीस ठाण्यात जाण्याची सूचना केली.

कन्नड फलक ठरले अडथळ्याचे

मी लगेच गुगल मॅपवर पोलीस स्टेशन सर्च केले. मात्र सर्वांत जवळचे पोलीस स्टेशन मागे असल्याचे लक्षात आले. त्यासाठी यू-टर्न घ्यावा लागला असता आणि तिला त्यामुळे संशय आला असता. म्हणून आम्ही तसे करणे टाळले. रस्त्यातील पाट्या कन्नड भाषेत असल्याने त्या वाचताही येत नव्हत्या आणि आमच्यासाठी हे एक आव्हानच होते, असे टॅक्सीचालक रेजॉनने सांगितले. त्यानंतर जवळच्या पोलीस स्टेशनची चौकशी करण्यासाठी मी एका रेस्टॉरंटजवळ टॅक्सी थांबविली. मग मी गाडीत बसलो आणि थेट चित्रदुर्ग येथील पोलीस स्टेशनला पोहोचलो. पोलीस स्टेशनसमोर गाडी उभी करताच सूचना सेठने विचारले की, मला इथे का घेऊन आलास? मी तिला सांगितले की, मला पोलिसांचे खूप फोन येत आहेत आणि त्यांना तुझ्याशी बोलायचे आहे.

मृतदेह सापडला, तरी सूचना शांतच!

त्यानंतर पोलिसांनी टॅक्सीची झडती घेतली आणि त्यांना बॅगमध्ये मृतदेह सापडला. इथपर्यंतच्या संपूर्ण प्रवासात सूचना शांत हाेती आणि तिने कोणतीही अस्वस्थता दाखवली नाही. कोणालाही तिने कॉल केला नाही किंवा एकही कॉल घेतला नाही, एकच कॉल तिने घेतला होता, जो कदाचित गोव्यातील हाॅटेलमधून आला असावा. बॅगमधून जेव्हा तिच्या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, तेव्हाही ती शांतच होती, असे डिसोझा याने सांगितले.      

logo
marathi.freepressjournal.in