

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर भाजपने त्यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्या राजकीय ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांचे राजकीय ज्ञान 'शून्य' असल्याची खरमरीत टीका केली.
'पारदर्शक निवडणुकांमुळे काँग्रेसची अडचण' राहुल गांधी यांच्या सादरीकरणावर (पीपीटी) निशाणा साधताना सुधांशु त्रिवेदी म्हणाले, काही वेळापूर्वी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पीपीटी सादर केली. ते ५० वर्षांपासून राजकारण समजून घेत असल्याचा दावा करतात, पण त्यांचे स्वतःचे वय अवघे ५६ वर्षे आहे. देशात जेव्हापासून पारदर्शक निवडणुका सुरू झाल्या आहेत, सीसीटीव्ही कॅमेरे आले आहेत आणि स्वतंत्र मीडिया सक्रिय झाला आहे, तेव्हापासून काँग्रेसला सत्तेत येणे कठीण झाले आहे.
सत्ताविरोधी लाटेच्या दाव्याचा समाचार
भाजपच्या आगमनानंतरच 'सत्ताविरोधी लाट' ही संकल्पना मोडीत निघाल्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा त्रिवेदी यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, सत्ताविरोधी लाट फक्त भाजपच्या काळातच नाहीशी झाली, असे म्हणणे म्हणजे राजकीय समजेचा पूर्णपणे अभाव आहे. राहुल गांधींना बहुदा भारतीय राजकीय इतिहासाची माहिती नाही. काँग्रेसविरोधात मात्र ही सत्ताविरोधी लाट अत्यंत सातत्यपूर्ण आणि मजबूत राहिल्याचा इतिहास आहे.
राज्यांची उदाहरणे देत त्रिवेदी यांनी स्पष्ट केले की, भाजपच्या उदयापूर्वीच अनेक राज्यांतील जनतेने काँग्रेसला नाकारले होते. तमिळनाडूः १९६७ पासून काँग्रेस सत्तेत आलेली नाही (तेव्हा भाजप चित्रातही नव्हता), पश्चिम बंगालः १९७७ पासून काँग्रेस बाहेर आहे; जेथे सलग ३४ वर्षे डाव्यांची सत्ता होती, उत्तर प्रदेशः १९८९ पासून काँग्रेस सत्तेपासून दूर आहे, बिहारः १९९० पासून काँग्रेसची सत्ता नाही, ओडिशाः १९९९ पासून काँग्रेसला यश मिळालेले नाही.
उत्तर कोरिया, सद्दाम
हरयाणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये सत्ताविरोधी लाट अचानक कशी गायब होते, असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी, "उत्तर कोरिया किंवा सद्दाम हुसेन यांच्या काळातील इराकमध्ये सत्ताविरोधी लाट नव्हती, जगातील अशा एकाही लोकशाहीवादी देशात सत्ताविरोधी लाट नसणे शक्य नाही, असा दावा केला होता.