हेमंत सोरेन यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीमुळे सुधीर चौधरींवर FIR, मागितली बिनशर्त माफी

हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना दिल्यानंतर जमीन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना अटक केली. यानंतर 31 जानेवारी (बुधवार) रोजी प्रसारित झालेल्या 'ब्लॅक अँड व्हाईट' शोमध्ये सोरेन यांच्याविरोधात बोलताना अँकर सुधीर चौधरी यांनी आदिवासींबद्दल वक्तव्य केले होते.
हेमंत सोरेन यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीमुळे सुधीर चौधरींवर FIR, मागितली बिनशर्त माफी

प्रसिद्ध अँकर सुधीर चौधरी यांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात केलेल्या आदिवासीसंदर्भातील वक्तव्याबाबत बिनशर्त माफी मागितली आहे. सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना दिल्यानंतर जमीन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना अटक केली. यानंतर 31 जानेवारी (बुधवार) रोजी प्रसारित झालेल्या 'ब्लॅक अँड व्हाईट' शोमध्ये सोरेन यांच्याविरोधात बोलताना चौधरी यांनी आदिवासींबद्दल वक्तव्य केले होते. या प्रकरणी त्यांच्याविरोधात आदिवासी समाजाविषयी जातीयवादी वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.

सुधीर चौधरी यांना अटक करण्याची मागणी-

चौधरी यांनी आदिवासी समाजाविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी एका आदिवासीने SC/ST कायद्यांतर्गत पोलीस तक्रार दाखल केल्याचे वृत्त आहे. सुधीर चौधरी यांनी त्यांच्या प्राईम टाईम शो 'ब्लॅक अँड व्हाईट'मध्ये आदिवासी समाजाविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल रांची येथील आदिवासी सेनेने तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या पोलीस तक्रारीत चौधरी यांच्याविरोधात FIR नोंदवून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

काय म्हणाले होते सुधीर चौधरी?

चौधरी यांची त्यांच्या प्राईम टाईम शो 'ब्लॅक अँड व्हाईट'मध्ये सोरेन यांना ईडीने अटक केल्याप्रकरणी बोलतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यात ते म्हणतात, "हेमंत सोरेन बाहेर येवोत अथवा न येवोत, ते आजची रात्र कुठे असतील, त्यांना चांगल्या जीवनशैलीची सवय आहे. ते खासगी विमानाने प्रवास करतात, महागड्या गाड्या वापरतात. आज त्यांच्यासाठी २०, ३०, ४० वर्षांपूर्वी एखाद्या आदीवासीप्रमाणे जंगलात जाण्यासारखे होईल. आजची रात्र फार अवघड जाणार आहे." चौधरी यांची ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर आदीवासी सेनेने त्यांच्याविरोधात FIR दाखल केली.

सुधीर चौधरी यांनी बिनशर्त माफी मागितली-

सुधीर चौधरी यांनी शनिवारी आदीवासी समजाची बिनशर्त माफी मागितली आहे. "माझ्यावर आदिवासींचा अपमान करण्याचे बिनबुडाचे आरोप पाहून मला वाईट वाटते. हेमंत सोरेन यांच्यावर टीका करणे म्हणजे आदिवासींचा अपमान करणे असे नाही. माझा शो आदिवासींच्या मतांचा श्रीमंत नेत्यांकडून कसा गैरवापर केला जातो यावर लक्ष केंद्रित करतो. एक व्हिडिओ क्लिप शेअर केली जात आहे, जी ना माझा पूर्ण संदेश देते ना संदर्भ. या व्हिडिओतमधून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे", असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

ते पुढे म्हणाले, मी आदीवासींविरोधात अपमानकारक शब्द वापरले नाहीत, आधीही कधी वापरले नाहीत. मी नेहमीच आदिवासींचे समर्थन केले असून त्यांना पाठिंबा दिला आहे त्यांनीही माझ्या आणि माझ्या शोबद्दल नेहमीच त्यांचे प्रेम दाखवले आहे. मी त्यांचा अपमान करण्याची कधी कल्पनाही नाही करु शकत", असे चौधरी म्हणाले.

तसेच, "मी सोशल मीडियावरील प्रत्येक व्यक्तीला उत्तरदायी नाही, पण माझ्या आदिवासी बांधवांना आणि भगिनींना समजावून सांगणे हे माझे कर्तव्य आहे असे मला वाटते. अनावधानाने त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची बिनशर्त माफी मागतो", असे चौधरी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in