साखर किंचित ‘गोड’ झाली; कारखान्यातील दर १८ टक्क्यांनी घटून ५५ रुपयांवर

साखरेची आयात करण्यास परवानगी देणे आणि साठेबाजी व सट्टेबाजीवर कडक निर्बंध घालणे या सरकारच्या निर्णयामुळे साखरेचे कारखान्यातील दर १८ टक्क्यांनी घसरून ५५ रुपये प्रति किलोवर आले आहेत, अशी माहिती अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी दिली.
साखर किंचित ‘गोड’ झाली; कारखान्यातील दर १८ टक्क्यांनी घटून ५५ रुपयांवर
साखर किंचित ‘गोड’ झाली; कारखान्यातील दर १८ टक्क्यांनी घटून ५५ रुपयांवर 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी दिल्ली : साखरेची आयात करण्यास परवानगी देणे आणि साठेबाजी व सट्टेबाजीवर कडक निर्बंध घालणे या सरकारच्या निर्णयामुळे साखरेचे कारखान्यातील दर १८ टक्क्यांनी घसरून ५५ रुपये प्रति किलोवर आले आहेत, अशी माहिती अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी दिली.

गेल्या आठवड्यात साखरेचे कारखान्यातील दर विक्रमी ६७ रुपये प्रति किलोपर्यंत वाढले होते; कारखान्यांनी दर ‘कृत्रिमरीत्या वाढवल्यामुळे’ ही दरवाढ झाली होती, असे चोप्रा यांनी सांगितले.

कारखान्यांनी वाढवलेले साखरेचे दर कमी होऊ लागले आहेत. ते ५५ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत आणि येत्या काही दिवसांत त्यात आणखी घट होईल,’ असे चोप्रा यांनी सांगितले.

किमतींमधील ही वाढ बाजाराच्या मूलभूत स्थितीवर आधारित नव्हती, असे त्यांनी नमूद केले. कारण, २०२५-२६ या विपणन वर्षासाठी साखरेचे उत्पादन ३४३ लाख टनांच्या सुरुवातीच्या अंदाजावरून ३०६ लाख टनांपर्यंत खाली आले असले, तरी देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. देशांतर्गत वार्षिक मागणी सुमारे २८०-२८५ लाख टन आहे.

सरकारने १० लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीस परवानगी दिली, मोठ्या प्रमाणात साखर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी साठवणुकीची मर्यादा निश्चित केली आणि साठेबाजी व सट्टेबाजी रोखण्यासाठी राज्यांना तपासणी मोहीम तीव्र करण्याचे निर्देश दिले.

भरारी पथके तैनात

साठेबाजी तपासण्यासाठी देशभरात भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत आणि केंद्राच्या हस्तक्षेपामुळे दरवाढ रोखण्यास मदत झाली आहे, असे सांगत त्यांनी नमूद केले की कारखान्यातील दरांमध्ये आणखी घट होण्याची अपेक्षा आहे. सामान्यतः कारखान्यातील दरांमध्ये आणि घाऊक दरांमध्ये २-३ रुपये प्रति किलोचा, तर कारखान्यातील दर आणि किरकोळ दरांमध्ये ७-८ रुपये प्रति किलोचा फरक असतो.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in