तीन वर्षांत १.१२ लाख रोजंदारी कामगारांच्या आत्महत्या ; सरकारची लोकसभेत माहिती

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना ही १८ ते ५० वर्षांखालील नागरिकांसाठी असून, त्यांच्या बँक अथवा पोस्ट खात्यातून विम्याची रक्कम वळती केली जाते
तीन वर्षांत १.१२ लाख रोजंदारी कामगारांच्या आत्महत्या ; सरकारची लोकसभेत माहिती

एकीकडे बेरोजगारांची संख्या वाढत असतानाच, देशात २०१९ ते २०२१ या तीन वर्षांच्या काळात १.१२ लाख रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. केंद्रीय कामगारमंत्री भूपेंदर यादव यांनी सोमवारी लोकसभेत ही आकडेवारी जाहीर केली.

“६६,९१२ गृहिणी, ५३,६६१ स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती तसेच ४३,४२० कर्मचारी आणि ४२,३८५ बेरोजगार असलेल्या युवकांनी या कालावधीत आत्महत्या केली. त्याचबरोबर ३५,९५० विद्यार्थी आणि ३१,८३९ शेतकऱ्यांनी या तीन वर्षांत आत्महत्या केली,” अशी माहितीही कामगारमंत्री भूपेंदर यादव यांनी दिली.

कामगारमंत्री म्हणाले की, “असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायदा, २००८ नुसार, सरकारला रोजंदारी कामगारांसह असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे बंधनकारक आहे. त्यांच्यासाठी केंद्र सरकारकडून जीवन आणि अपंगत्व संरक्षणासंबंधी कल्याणकारी योजना, आरोग्य आणि मातृत्व लाभ, वृद्धावस्थेतील संरक्षण त्याचबरोबर इतरही कायदे तयार करण्यात आले आहेत. जीवन आणि अपंगत्वासंबंधीचे लाभ प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना तसेच प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेअंतर्गत घेता येऊ शकतात.”

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना ही १८ ते ५० वर्षांखालील नागरिकांसाठी असून, त्यांच्या बँक अथवा पोस्ट खात्यातून विम्याची रक्कम वळती केली जाते.

१४.८२ कोटी लोकांनी घेतला लाभ

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेंतर्गत विमा घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्या व्यक्तीला २ लाख रुपयांची रक्कम दिली जाते. या योजनेच्या विम्यासाठी वर्षातून ४३६ रुपयांची रक्कम संबंधित व्यक्तीच्या खात्यातून कापून घेतली जाते. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेचा लाभ १४.८२ कोटी लोकांनी लाभ घेतल्याची माहिती कामगारमंत्री भूपेंदर यादव यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in