सुकेशने जॅकलिनसाठी श्रीलंकेत घेतले होते घर;ईडीचे आरोपपत्र दाखल

सुकेशची पार्श्वभूमी माहित असतानाही जॅकलिनने सुकेशकडून भेटवस्तू घेतल्या.
सुकेशने जॅकलिनसाठी श्रीलंकेत घेतले होते घर;ईडीचे आरोपपत्र दाखल

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससाठी श्रीलंकेत घर खरेदी केले होते. बहारीन आणि मुंबईतही घर घेण्यासाठी सुकेशने अ‍ॅडव्हान्स रक्कमदेखील दिली होती, असा दावा ईडीने आपल्या आरोपपत्रात केला आहे. जॅकलिनचे आई-वडील बहारीनमध्ये राहतात. सुकेश हा फसवणूक करणारा होता, हे जॅकलिनला आधीच ठाऊक होते, असा दावाही ईडीने केला आहे.

दिल्लीतील पटियाला कोर्टात १७ ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. यात जॅकलिनवर सुकेशकडून ५.७१ कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. सुकेशची पार्श्वभूमी माहित असतानाही जॅकलिनने सुकेशकडून भेटवस्तू घेतल्या. आणि तो मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकल्यानंतर जॅकलिन स्वत:ला पीडित म्हणून दाखवत आहे, असेही ईडीने म्हटले आहे. याप्रकरणी ईडीने जॅकलिनलाही सहआरोपी केले आहे. ईडीच्या आरोपपत्रात असलेल्या उल्लेखानुसार, जॅकलिनने कबूल केले आहे की सुकेशने तिला श्रीलंकेत घर खरेदी केल्याबद्दल सांगितले होते. मात्र, अद्याप ती त्या घरात कधी गेली नाही. ही मालमत्ता श्रीलंकेतील वेलिगामा या प्रसिद्ध पर्यटनस्थळी असल्याचे सांगितले जाते.

याशिवाय सुकेशने जुहू येथेदेखील जॅकलिनसाठी बंगला बुक केला होता. एवढेच नाही तर त्याने जॅकलिनच्या आई-वडिलांना बहारीनमध्ये घर भेट म्हणून दिले होते. या मालमत्तांच्या खरेदीची माहिती सुकेशने त्याची सहकारी पिंकी इराणी हिला दिली होती. पिंकीवरच सुकेश आणि जॅकलिन यांच्यात मैत्री घडवून आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्या बदल्यात पिंकीलादेखील करोडो रुपये देण्यात आले होते. मात्र, यापूर्वी जॅकलिनने तिच्या वकिलामार्फत न्यायालयात सांगितले होते की, तिला सुकेशची खरी ओळख माहित नाही. सुकेशला ती शेखर म्हणून ओळखत होती; पण ईडीचा आरोप आहे की, महिन्याभरातच जॅकलिनला बातम्यांद्वारे कळले होते की, तो सुकेश चंद्रशेखर आहे. असे असतानाही ती त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू घेत राहिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in