
सुकमा : छत्तीसगडमध्ये नक्षलवादविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुकमामध्ये १६ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यामध्ये २ कट्टर नक्षलवाद्यांचा समावेश आहे. यातील ६ नक्षलवाद्यांवर २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. याशिवाय, एक महिला आणि एका पुरुष नक्षलवाद्यावर प्रत्येकी ८ लाख रुपयांचे बक्षीसही होते.
सुकमामध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या १६ माओवाद्यांमध्ये अनेक जहाल नक्षलवादी आहेत, त्यांच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सर्व नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण धोरण आणि ‘नियाद नेल्ला नर’ योजनेंतर्गत आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला.
शरण आलेल्यांपैकी ६ नक्षलवाद्यांवर प्रशासनाने २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. ओदिशासारख्या अन्य विभागातील नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पण केले आहे. या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर एक गाव पूर्णपणे नक्षलमुक्त झाले आहे, ज्याला प्रशासनाकडून १ कोटी रुपये दिले जाणार आहेत.