
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स सुमारे ९ महिने अंतराळात घालवल्यानंतर आता पुन्हा पृथ्वीवर परतल्या आहेत. त्या सुखरुप पृथ्वीवर परतल्यामुळे सर्वत्र आनंदाची लाट पसरली आहे. त्यांच्या मूळ गाव गुजरातच्या झूलासन येथेही प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
भारतीय प्रमाण वेळेनुसार १९ मार्च रोजी पहाटे ३.२७ वाजता, ड्रॅगन अंतराळयानाच्या कॅप्सूलने फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळील समुद्रात यशस्वी 'स्प्लॅशडाउन' केले आणि सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुखरुप परतल्याचे वृत्त सर्वत्र झळकले. हे समजताच झूलासन गावातील ग्रामस्थांनी रात्रीतूनच फटाक्यांची जोरदार आतषबाजी करीत आनंद साजरा केला. टीव्हीसमोर बसलेल्यांनी रस्त्यावर धाव घेत नाचत-गात सेलिब्रेशन केले. सकाळपासून तर गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. गावातील शाळेत देखील मोठे सेलिब्रेशन करण्यात आले. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही गरबा खेळत सुनीता विल्यम्स सुखरुप परतल्याचा जल्लोष केला. यापूर्वी सुनीता विल्यम्सचे पृथ्वीवर सुखरुप पुनरागमन व्हावे यासाठी गावकऱ्यांनी महादेवाच्या मंदिरात विशेष पूजा केली होती. हवन देखील करण्यात आले होते. त्यामुळे सुनीताच्या पुनरागमनाचे वृत्त झळकताच संपूर्ण गावात जणू दिवाळीसारखाच जल्लोष करण्यात आला.
सुनीता नक्कीच गावात पुन्हा येईल
यावेळी माध्यमांशी बोलताना, 'सुनीता आमच्या गावची मुलगी आहे. ती एकदा गावाला भेट द्यायला आली होती. आता ती पुन्हा नक्कीच गावात येईल', असा विश्वास देखील एका ग्रामस्थाने व्यक्त केला. आमच्या गावातली मुलगी अंतराळात अडकली होती, ती आता सुखरुप परतल्यामुळे आम्हाला अत्यानंद झाला आहे, असे गावकऱ्यांनी म्हटले.
सुनीता विल्यम्स तब्बल ९ महिने आणि १४ दिवसांनी सुरक्षितपणे पृथ्वीवर परतल्या आहेत. इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या ड्रॅगन अंतराळयानाद्वारे १७ तासांच्या प्रवासानंतर त्या पृथ्वीवर सुखरूप पोहोचल्या. त्यांच्यासोबत अन्य तीन अंतराळवीर देखील होते. ५ जून २०२४ रोजी सुनीता विल्यम्स यांनी बुच विल्मोर यांच्यासह अंतराळ स्थानकाकडे उड्डाण केलं होतं. त्यांची ही मोहिम केवळ आठवडाभराची होती. मात्र, त्यांच्या स्टारलायनर या अंतराळयानातून हेलियम गॅसची गळती आणि थ्रस्टर्समध्ये निर्माण झालेल्या अडचणी यामुळे त्यांना तब्बल ९ महिने अंतराळ स्थानकावर थांबावे लागले.