

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर आता सुपर एल-नीनो प्रवाह सक्रिय होण्याची भीती निर्माण झाली आहे. हा प्रवाह सक्रिय झाल्यास भारतातील मान्सून धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास देशाला दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो.
अमेरिकेची हवामान संस्था 'नॅशनल ओशेनिक ॲण्ड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन' (नोआ) च्या नव्या अपडेटनुसार, हा सुपर 'एल-निनो' मे ते जुलै या कालावधीतच सक्रिय होण्याची शक्यता आहे.
प्रशांत महासागराचे तापमान यंदा मे महिन्यात सामान्यपेक्षा ०.५ अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले गेले असून ही उष्णतेची स्थिती संपूर्ण मान्सून हंगामात कायम राहू शकते. गेल्या महिन्यात एल-निनो सक्रिय होण्याची शक्यता ६१ टक्के वर्तवली होती. जी आता वाढून ८२ टक्के झाली आहे.
भारतीय हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले की, याचा थेट परिणाम मान्सूनवर होणार असून देशात दुष्काळाचा धोका अधिक वाढणार आहे.
'नोआ' च्या अहवालानुसार, मे ते जुलै दरम्यान सुपर एल-निनो विकसित होण्याची शक्यता ८२ टक्के असून हा प्रभाव डिसेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ पर्यंत म्हणजेच हिवाळ्यापर्यंत कायम राहण्याची ९६ टक्के शक्यता आहे. तसेच हा एल-नीनो 'तीव्र' किंवा 'अति तीव्र' राहण्याची शक्यता ६७ टक्के आहे. यामुळे भारतात भीषण उष्णतेची लाट आणि कमकुवत मान्सूनचे सावट अधिक गडद झाले आहे. याच्या प्रभावामुळे भारत आणि दक्षिण-पूर्व आशियात पाऊस कमी होईल, तर इंडोनेशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलियात ओलावा संपून जंगलांना आग लागण्याचा धोका वाढेल.
महाराष्ट्राला फटका?
या हवामानाचा सर्वाधिक फटका उत्तर, पश्चिम आणि मध्य भारताला बसण्याची शक्यता असून येथील शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते. मध्य आणि पश्चिम भारतातील चांगल्या पावसाच्या क्षेत्रांमध्येही यंदा सामान्यापेक्षा कमी पाऊस होईल. मध्य प्रदेशातील इंदूर, उज्जैन, ग्वाल्हेर, चंबळ, जबलपूर, रीवा, शहडोल, सागर आणि नर्मदापुरम या भागांमध्ये कमी पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे लडाख, राजस्थानचे काही भाग, तेलंगणा आणि उत्तर भारताच्या काही मर्यादित भागांवर मात्र याचा प्रभाव कमी जाणवेल.
पुणे : गेल्या वर्षपिक्षा ६ दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे, अशी माहिती हवामान विभागाचे प्रमुख डॉ. एस. डी. सानप यांनी दिली. हवामान विभागाचे प्रमुख डॉ. सानप म्हणाले की, आज मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला. गेल्या २४ ते ४८ तासांपासून अंदमानमध्ये पाऊस पडत आहे. केरळमध्ये येत्या २६ जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
मांडवा जलवाहतूक २६ मे पासून बंद
मुंबई : पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यानची प्रवासी वाहतूक २६ मे पासून बंद ठेवण्यात येणार आहे. अरबी समुद्रात निर्माण होणारे वारे आणि खवळलेल्या लाटांमुळे महाराष्ट्र सागरी मंडळाने हा वार्षिक निर्णय घेतला आहे.
दरवर्षी मान्सूनपूर्वी समुद्रातील पाण्याची पातळी आणि वाऱ्याचा वेग वाढतो. त्यामुळे लहान प्रवासी बोटी चालवणे अत्यंत धोक्याचे ठरते. त्यामुळे यंदा २६ मे ही सेवा सुरू राहण्याचा शेवटचा दिवस असेल.