
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी मंगळवारी पुन्हा शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आली; मात्र सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी तातडीने सुनावणी घेण्यास पुन्हा नकार दिला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार २२ ऑगस्टलाच या प्रकरणावर सुनावणी होईल, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.
शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचे सांगत धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. यासाठी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील सुनावणी १९ ऑगस्टला होणार आहे. यावर शिवसेनेने चिंता व्यक्त केली आहे. १९ ऑगस्टला निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय देण्याची शक्यता असून, निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्याविरोधात लागण्याची भीती शिवसेनेला आहे. त्यामुळे या प्रकरणावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती मंगळवारी शिवसेनेने सुप्रीम कोर्टात केली; मात्र सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी याप्रकरणी तातडीने सुनावणीसाठी नकार दिला. “राज्यातील सत्ता -संघर्षाबाबतची सुनावणी आणखी मोठ्या घटनापीठाकडे द्यायची की नाही, हे ठरवायचे आहे. त्यामुळे सुनावणीस विलंब होत आहे. याबाबत आम्ही आदेश देऊ,” असे सांगत रमणा यांनी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.