

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील वादग्रस्त भोजशाळा परिसरालगत असलेल्या दर्ग्याच्या जागेवर मुस्लिम समाजाला शुक्रवारी नमाज अदा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी परवानगी दिली.
शुक्रवारी दुपारी १ ते ३ या वेळेत मुस्लिमांना या ठिकाणी नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. यापूर्वी १४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने मुख्य खटल्याचा निकाल लागेपर्यंत शुक्रवारी दुपारी १ ते ३ या वेळेत नमाजासाठी वादग्रस्त स्थळालगत एक वेगळी मोकळी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, हाजी मुनीर अहमद यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत प्रशासनाकडून न्यायालयाच्या निर्देशांचे पालन होत नसल्याचा आरोप केला.
धार प्रशासन भोजशाळा परिसरापासून १.३ किलोमीटर लांब अंतरावर जागा देत असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. नमाजाची जागा इतकी जवळ असावी जेथून नमाज अदा करताना मशीद स्पष्ट दिसेल, असा युक्तिवाद मुस्लिम पक्षाने केला होता.
या निर्णयामुळे राज्य सरकार आणि मुस्लिम पक्षाला परस्पर संमतीने नमाजासाठी अन्य जागेचा पर्याय शोधण्यास कोणतीही बंदी नसेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.