सरन्यायाधीशांवर कोर्टातच हल्ल्याचा प्रयत्न; शूज फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाला पोलिसांकडून अटक

सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न एका वकिलाने केला. मात्र सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखत या वकिलाला अडवले आणि न्यायालयाबाहेर नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. राकेश किशोर असे त्या वकिलाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
सरन्यायाधीशांवर कोर्टातच हल्ल्याचा प्रयत्न; शूज फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाला पोलिसांकडून अटक
Published on

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न एका वकिलाने केला. मात्र सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखत या वकिलाला अडवले आणि न्यायालयाबाहेर नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. राकेश किशोर असे त्या वकिलाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

राकेश किशोर यांनी न्यायालयात केलेल्या कृत्यानंतर त्यांची तीन तास कसून चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. या वकिलाविरोधात कुठलाही गुन्हा दाखल करू नका. तसेच चौकशीनंतर त्यांना सोडून द्या, असे सरन्यायायाधीशांच्या कार्यालयाकडून पोलिसांना सांगण्यात आले. त्यानंतर राकेश किशोर यांचा बूट आणि कागदपत्रे त्यांच्या स्वाधीन करून त्यांना सोडून देण्यात आले.

सोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू असताना सुनावणीवेळी महत्त्वाचा युक्तिवाद चालू होता. त्यावेळी राकेश किशोर हा वकील पुढे आला अन् पायातील बूट काढून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे फेकण्याचा प्रयत्न केला. वेळीच सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतले आणि कार्टाच्या बाहेर काढले. कोर्टाबाहेर जाताना, ‘हिंदुस्तान आता सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही,’ अशा घोषणा त्याने दिल्या.

सुप्रीम कोर्टात गोंधळाचे वातावरण असतानाही, सरन्यायाधीश भूषण गवई मात्र शांत, संयमीपणे आपले न्यायदानाचे काम करत होते. “अशा घटनांमुळे आम्ही विचलीत होणार नाही. तुम्ही आपापला युक्तिवाद सुरू ठेवा. आपण सगळ्यांनी याकडे लक्ष देऊ नये. माझ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही,” असे सरन्यायाधीश गवई म्हणाले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांकडून लगेच कार्यवाही करण्यात आली आणि न्यायालयाच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली.

आरोपी वकील राकेश किशोर हा २०११मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बारमध्ये नोंदणीकृत होता. मध्य प्रदेशातील खजुराहो येथे भगवान विष्णूच्या ७ फूट उंच शिरच्छेदित पुतळ्याच्या जीर्णोद्धारावर सरन्यायाधीश गवई यांच्या टिप्पण्यांमुळे वकील नाराज असल्याचे मानले जाते. १६ सप्टेंबर रोजी, सरन्यायाधीशांनी तुटलेल्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. तसेच सरन्यायाधीश म्हणाले होते की, “जा आणि देवाला स्वतःहून ते करायला सांगा. तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त असल्याचा दावा करता, म्हणून जा आणि त्यांची प्रार्थना करा.” या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यावर तसेच सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर सरन्यायाधीशांनी ‘मी सर्व धर्मांचा सन्मान करतो,’ असे स्पष्टीकरणही दिले होते. मात्र सरन्यायाधीशांनी केलेल्या याच टिप्पणीमुळे वकिलाने संताप व्यक्त करत हा हल्ला केल्याची चर्चा आहे.

ही देशासाठी धोक्याची घंटा -शरद पवार

“आपल्या देशात पेरले जाणारे विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते. त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशाप्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणे, हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे,”, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

लज्जास्पद आणि घृणास्पद प्रकार -खर्गे

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न लज्जास्पद आणि घृणास्पद आहे. हा आपल्या न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर आणि कायद्याच्या राज्यावर हल्ला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती गुणवत्ता, सचोटी आणि चिकाटीने देशाच्या सर्वोच्च न्यायिक पदावर पोहोचते आणि त्यांना अशाप्रकारे लक्ष्य केले जाते, तेव्हा ते एक गंभीर संदेश देते. संविधानाचे रक्षण करण्यासाठी सामाजिक अडथळे तोडणाऱ्या माणसाला धमकावण्याचा आणि अपमानित करण्याचा प्रयत्न हे प्रतिबिंबित करते. अशा निर्लज्ज कृत्याने गेल्या दशकात आपल्या समाजाला कसे द्वेष, धर्मांधता आणि धर्मांधतेने ग्रासले आहे हे दर्शविते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने, मी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. आपल्या न्यायव्यवस्थेची सुरक्षा सर्वतोपरी आहे, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.

हा संविधानावरच हल्ला -सोनिया गांधी

सर्वोच्च न्यायालयातच भारताच्या सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी केवळ शब्द पुरेसे नाहीत. त्यांच्यावर झालेला हल्ला केवळ त्यांच्यावर नव्हे तर आपल्या संविधानावरही हल्ला आहे. सरन्यायाधीश भूषण गवई हे खूप दयाळू आहेत, परंतु देशाने त्यांच्यासोबत एकजुटीने, तीव्र संतापाने उभे राहिले पाहिजे, असे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले.

खटला दाखल, परवाना निलंबित

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे वकील राकेश किशोर यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांना वकिली करण्यापासून तत्काळ निलंबित करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. दिल्ली बार कौन्सिलने हा आदेश जारी केला आहे. कौन्सिलने वकील राकेश किशोर यांचा वकिली करण्याचा परवाना निलंबित केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in