विद्यार्थी मृत्यूप्रकरणी शिक्षकाची सुप्रीम कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; विद्यार्थ्यावर रागावणे म्हणजे जीवन संपविण्यास प्रवृत्त करणे नव्हे!

एखाद्याला रागावणे किंवा खडसावणे म्हणजे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे नव्हे, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत एका शिक्षकाला दोषमुक्त केले. वसतिगृहातील एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने शाळा व वसतिगृहाचा प्रभारी असलेल्या एका शिक्षकाला दोषी ठरवले होते. विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप या शिक्षकावर होता.
विद्यार्थी मृत्यूप्रकरणी शिक्षकाची सुप्रीम कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; विद्यार्थ्यावर रागावणे म्हणजे जीवन संपविण्यास प्रवृत्त करणे नव्हे!
Published on

नवी दिल्ली : एखाद्याला रागावणे किंवा खडसावणे म्हणजे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे नव्हे, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत एका शिक्षकाला दोषमुक्त केले. वसतिगृहातील एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने शाळा व वसतिगृहाचा प्रभारी असलेल्या एका शिक्षकाला दोषी ठरवले होते. विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप या शिक्षकावर होता.

रागावल्याने किंवा खडसावल्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करेल, अशी कल्पनाही सामान्य व्यक्ती करू शकत नसल्याचे निरीक्षण न्या. अहसानुद्दीन अमानुल्ला व न्या. प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने नोंदवले. संपूर्ण प्रकरणाचा सारासार विचार केल्यानंतर हस्तक्षेप करण्यासाठी आम्हाला हा योग्य खटला वाटला. एका विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून शिक्षक दुसऱ्या विद्यार्थ्याला रागवत असेल, त्यानंतर विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलेल, अशी कल्पना कोणीही करू शकणार नाही. मृत विद्यार्थ्याविरोधात दुसऱ्या विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीची दखल घेण्यासाठी व उपाययोजनेसाठी शिक्षकाला किमान रागावणे गरजेचे होते, असे न्यायालय म्हणाले.

प्रकरण काय?

वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याबद्दल शिक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर शिक्षकाने तक्रारदार मुलाला त्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला खडसावले होते. त्यानंतर विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेतला. याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयानेही शिक्षकाला दोषी ठरवले होते.

logo
marathi.freepressjournal.in