सुप्रीम कोर्टाकडून एसआयटी स्थापन; कर्नल सोफियांवरील आक्षेपार्ह टिप्पणी, मंत्री विजय शहा यांना कडक शब्दांत फटकारले

‘ऑपरेशन सिंदूर’बाबतची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले. इतकेच नव्हे, तर शाह यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या ‘एफआयआर’बाबतची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापनाही केली.
सुप्रीम कोर्टाकडून एसआयटी स्थापन; कर्नल सोफियांवरील आक्षेपार्ह टिप्पणी, मंत्री विजय शहा यांना कडक शब्दांत फटकारले
Published on

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले. इतकेच नव्हे, तर शाह यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या ‘एफआयआर’बाबतची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापनाही केली.

खंडपीठाने सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी सांगितले की, संपूर्ण देशाला विजय शाह यांच्या वक्तव्याची लाज वाटते. तुम्ही स्वत:ची यामधून कशी सुटका करावयाची याचा विचार करता, कायद्याच्या राज्यावर दृढविश्वास ठेवणारा आपला देश आहे, असे खडेबोल न्या. सूर्य कांत यांनी सुनावले.

शब्द तोलून-मापून वापरा!

तुम्ही एक सार्वजनिक व्यक्ती आहात, एक अनुभवी राजकारणी आहात, तुम्ही बोलताना शब्द तोलून-मापून वापरले पाहिजेत, आम्ही तुमचा व्हिडीओ येथे प्रदर्शित केला पाहिजे, मीडियाचे लोक तुमच्या व्हिडीओच्या खोलात जात नाहीत. तुम्ही अशा टप्प्यावर होता जिथे तुम्ही अपशब्द वापरणार होता, खूप घाणेरडी भाषा, पण तुमच्यावर काही दबाव आला आणि तुम्ही थांबलात, सशस्त्र दलांसाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला खूप जबाबदारीने वागण्याची गरज आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

माफी अस्वीकारार्ह!

तुम्ही केलेली बेजबाबदार टिप्पणी पूर्णपणे अविचारी होती. आम्हाला तुमच्या माफीची आवश्यकता नाही. कायद्यानुसार कसे वागायचे हे आम्हाला माहिती आहे. तुमचा माफीनामा हा केवळ कायदेशीर कचाट्यापासून पळ काढण्यासाठी आहे, आम्ही तो स्वीकारणार नाही, अशा शब्दांत खंडपीठाने मध्य प्रदेशमधील भाजपचे मंत्री कुंवर विजय शाह यांच्यावर ताशेरे ओढले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मध्य प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी रात्री १० वाजेपूर्वी ‘एसआयटी’ स्थापन करावी, असा आदेशही न्या. सूर्य कांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने दिला आहे.

त्रिसदस्यीय एसआयटी

सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत स्पष्ट केले की, मध्य प्रदेश राज्याबाहेरील तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकाने भाजप मंत्री कुंवर विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याची चौकशी करावी. या पथकात एक महिला अधिकारी असावी.

शाह यांच्या दोन याचिकांवर सुनावणी

कर्नल सोफिया कुरेशींवरील कथित आक्षेपार्ह टिप्पणीची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून गंभीर दखल घेतली. याप्रकरणी विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा दिलेला आदेश, तसेच १५ मे रोजी शाह यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या ‘एफआयआर’वर असमाधान व्यक्त केल्याप्रकरणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर न्या. सूर्य कांत आणि न्या. एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली.

मध्य प्रदेश सरकारच्या निष्क्रियतेवरही प्रश्न

यावेळी खंडपीठाने याप्रकरणी मध्य प्रदेश सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेप केल्याने तुम्हाला 'एफआयआर' पुन्हा लिहावा लागला, तेव्हा तुम्ही काय केले? उच्च न्यायालयाने त्यांचे कर्तव्य बजावले आहे. त्यांना वाटले की स्वतःहून कारवाई करणे आवश्यक आहे. तुम्ही आतापर्यंत आणखी काहीतरी करायला हवे होते, अशी अपेक्षाही सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारकडून व्यक्त केली.

पुढील सुनावणी २८ मे रोजी

कर्नल सोफिया कुरेशींवरील कथित आक्षेपार्ह टिप्पणीबाबत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून निर्देश दिले. याप्रकरणी विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांच्या अटकेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सोमवारच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, आम्ही या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवू इच्छित नाही; परंतु त्यांनी एसआयटीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करावा. याप्रकरणी पुढील सुनावणी २८ मे रोजी होईल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in