नवी दिल्ली : दिल्ली मद्यधोरण घोटाळा भ्रष्टाचार आणि मनी लॉण्ड्रिंगप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बीआरएस पक्षाच्या नेत्या के. कविता यांना जामीन मंजूर केला. के. कविता या जवळपास पाच महिन्यांपासून कोठडीत आहेत आणि सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) याप्रकरणी करीत असलेला तपास पूर्ण झाला आहे, त्यामुळे तपासासाठी के. कविता यांना कोठडीत ठेवण्याची गरज नाही, असे न्या. भूषण गवई आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या पीठाने स्पष्ट केले.
या दोन प्रकरणांमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने १ जुलैच्या आदेशान्वये कविता यांना जामीन नाकारला होता, तो निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला. दिल्ली मद्यधोरण ठरविणे आणि त्याची अंमलबजावणी करणे यामध्ये कविता या प्रथमदर्शनी मुख्य सूत्रधार असल्याचे दिसून येत आहे, असे स्पष्ट करून दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
कविता यांना दोन प्रकरणांसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचा जातमुचलका सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचप्रमाणे कनिष्ठ न्यायालयात पासपोर्ट जमा करण्याचे आणि पुरावा नष्ट करण्याचे प्रयत्न न करण्याचे व साक्षीदारांवर प्रभाव न टाकण्याचेही आदेश दिले आहेत.