
नवी दिल्ली : जे जवान प्रशिक्षणाच्या वेळी जखमी होतात, काही दिव्यांगही होतात, त्यांना बाहेर काढले जाते. अशाच ५०० जवानांना न्याय देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने स्वत: याची दखल घेत केंद्र सरकार आणि तिन्ही सैन्य दलाकडे उत्तर मागितले आहे.
१९८५ पासून आजपर्यंत देशातील सैनिकी संस्था एनडीए आणि आयएमएसारख्या ट्रेनिंगमध्ये जवळपास ५०० जवान जखमी अथवा दिव्यांग झाले आहेत. जे जवान ट्रेनिंग काळात जखमी अथवा दिव्यांग झाले, त्यांना वैद्यकीय कारण देत सैन्यातून बाहेर केले गेले. त्यातील अनेक जण अद्याप उपचारासाठी झुंज देत आहेत. मेडिकल ट्रिटमेंटसाठी या जवानांना महिन्याला ४० हजारांपर्यंत भरपाई दिली जाते. परंतु ही रक्कम कमी पडते, असे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. एकट्या एनडीएमध्ये २० हून अधिक जवान असे आहेत ज्यांना २०२१ ते जुलै २०२५ या ५ वर्षांच्या काळात मेडिकलचा हवाला देत सेवेतून बाहेर करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराचा स्वत:हून दखल घेतली आहे.
ते हात आता ग्लासही उचलू शकत नाहीत
शुभम गुप्ता (३३) हा त्याच जवानांपैकी एक होता ज्याने देशसेवेचे स्वप्न पाहून सैन्यात भरती होण्याचे ठरवले. परंतु कठीण ट्रेनिंग काळात तो कायमचा दिव्यांग झाला. शुभम २०१० मध्ये लढाऊ विमान चालवण्यासाठी एनडीएत सहभागी झाला होता. परंतु २०१२ साली एक डीप ड्राइव्ह करताना त्याच्या पाठीच्या कण्याला इतकी जबर जखम झाली की आज तो स्वत:च्या हाताने पाण्याचा ग्लासही उचलू शकत नाही. त्याच्या मानेखालचा भाग पॅरालाइज्ड झाला आहे.
फायटर सीट नव्हे आता व्हिलचेअर
सैनिक स्कूलमधील कार्तिक शर्मा २०१५ ते २०२१ पर्यंत एनडीएचा भाग होते. लहानपणापासून त्याला एअरफोर्समध्ये जाऊन फायटर विमानाच्या सीटवर बसायचे होते. परंतु २७ वर्षीय कार्तिक आता ऑटोमॅटिक व्हिलचेअरवर आयुष्य जगत आहे. कारण ट्रेनिंग काळात त्याला मोठी दुखापत झाली. त्यातून त्याला चालणे, पकडणे आणि इतर शारीरिक हालचालींसाठी मदतीचा आधार घेण्याची गरज पडत आहे.
नुकसानभरपाईही वाढवा
न्या. बी. व्ही. नागरत्ना, न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीठाने वेगवेगळ्या लष्करी संस्थांमध्ये कठीण प्रशिक्षण घेत असलेल्या कॅडेट्सच्या मृत्यू किंवा अपंगत्वाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी विमा संरक्षण प्रदान केले पाहिजे, असे केंद्र सरकारला सांगितले. त्याशिवाय दिव्यांग झालेल्या कॅडेट्सला मिळणारी ४० हजारांची रक्कम वाढवण्याचे निर्देश कोर्टाने केंद्राला दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ सप्टेंबरला होणार आहे.