

नवी दिल्ली : सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायव्यवस्था यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना फौजदारी अवमान प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सरन्यायाधीश आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने ही नोटीस जारी केली असून सध्यातरी या दोघांनाही वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट देण्यात आली आहे. न्यायालयाकडून त्यांच्या स्पष्टीकरणाची प्रतीक्षा केली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांनी ही अवमान याचिका दाखल केली होती. राऊत आणि वागळे यांनी केलेली विधाने ही न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला तडा देणारी आणि न्याय्य टीकेच्या मर्यादेबाहेर जाणारी असल्याचे याचिकेत म्हटले होते.