
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने सोमवारी कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्या. एन. व्ही. अंजारिया, गोहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. विजय बिष्णोई व मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. ए. एस. चांदूरकर यांच्या नावांची शिफारस केली आहे.
सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय कॉलेजियमने या तीन न्यायमूर्तींच्या नावांची शिफारस केली. सुप्रीम कोर्टातून तीन न्यायमूर्ती निवृत्त झाले आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमची सोमवारी बैठक झाली. यात तीन न्यायाधीशांची सुप्रीम कोर्टासाठी नेमणूक करण्यासाठी शिफारस केली. सुप्रीम कोर्टात सध्या ३४ न्यायाधीशांची पदे आहेत. आता ३१ न्यायाधीश आहेत.
न्या. चांदूरकर यांनी कायद्याची पदवी घेतल्यानंतर २१ जुलै १९८८ मध्ये वकिली सुरू केली. १९९२ ते नागपूरला आले. तेथील विविध न्यायालयात त्यांनी वकिली केली. २०१३ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.