
नवी दिल्ली : केंद्र सरकारने गुरुवारी न्यायमूर्ती अतुल एस. चांदुरकर, न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया आणि न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली.
केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटले की, “भारताच्या संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपती, भारताच्या मुख्य न्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर, एन. व्ही. अंजारिया, विजय बिश्णोई आणि अतुल चांदूरकर यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.” या तीन नवीन नियुक्त्यांसह सर्वोच्च न्यायालयाची पूर्ण मंजूर संख्या ३४ न्यायाधीशांची झाली आहे.
भारताचे मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने २६ मे रोजी उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्याची शिफारस केली होती. विदर्भाचे सुपूत्र असलेले न्यायाधीश अतुल एस. चांदुरकर हे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. यापूर्वी विदर्भातून न्या. मोहम्मद हिदायतुल्ला, न्या. जनार्दन मुधोळकर, न्या. ए. पी. सेन, न्या. विकास सिरपूरकर, न्या. शरद बोबडे व न्या. भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे. यापैकी न्या. हिदायतुल्ला व न्या. बोबडे यांनी सरन्यायाधीशपद भूषवले असून सध्या भूषण गवई हे सरन्यायाधीशपदी कार्यरत आहेत.
न्यायाधीश एन.व्ही. अंजारिया हे सध्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. मूळचे राजस्थानचे असलेले न्यायाधीश विजय बिश्णोई हे सध्या गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत.